Vitthal-Rukmini temple – पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे पुरातन सौंदर्य जतन व संवर्धन करण्याचे काम भारतीय पुरातत्व विभागाकडून सुरू आहे. या मंदिर संवर्धनासाठी गेल्या तीन वर्षात ५० कोटींपेक्षा अधिक रक्कम खर्च झाली आहे. मात्र, मंदिराच्या छतावरील गळती थांबवण्यात मंदिर समिती यशस्वी झालेली नाही. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या हलक्या पावसामुळे मंदिराच्या छताला मोठी गळती लागली आहे. पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिराचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाने सुमारे १५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. सन २०२३ पासून या कामाला सुरुवात झाली आहे. आराखड्यात विठ्ठल मंदिर, सभामंडप, शिखर, रुक्मिणी मंदिर, महालक्ष्मी मंदिर, नामदेव पायरी, नगारखाना, बाजीराव पडसाळ, विनायक मंदिर, व्यंकटेश मंदिर, टेन्साईल वर्क (आतील व बाहेरील), दर्शनबारी, स्ट्रक्चरल ऑडिट, वॉटर सप्लाय व ड्रेनेज, इलेक्ट्रिकल वर्क, साऊंड सिस्टीम, फायर फायटिंग सिस्टीम, लक्ष्मण पाटील देवस्थान, अंबाबाई मंदिर, श्री रोकडोबा मंदिर, श्री सोमेश्वर मंदिर, सभामंडप सागवाणी काम, इतर परिवार देवता मंदिरे तसेच संत नामदेव महाद्वार यांच्यासह अनेक कामांचा समावेश आहे. भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली गेल्या तीन वर्षापासून ही कामे सुरू आहेत. तथापि, ही कामे अतिशय संथगतीने केली जात आहेत, अशी तक्रार वारकरी संघटना आणि इतर सामाजिक संघटनांनी केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंदिरात काही दिवसांपूर्वी आले होते. त्यावेळी त्यांनी सुध्दा मंदिर संवर्धनाचे कामकाजाची पाहणी करायला हवी होती. परंतु तसे घडले नाही. मंदिर समिती प्रशासनाकडून या कामात मोठा घोटाळा झाला असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे शासनाने संबंधित बेजबाबदार प्रशासकीय अधिकारी व ठेकेदारांची व या कामाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.