Pune District : जैन मंदिराचे नव्याने बांधकाम करावे

नारायणगाव : मुंबई महानगरपालिकेने विलेपार्ले पूर्व येथील जैन समाजाचे जुने मंदिर उद्ध्वस्त केल्याने नारायणगाव येथील जैन संघाने घटनेचा निषेध केला आहे. जैन मंदिराचे पुन्हा नव्याने बांधकाम करावे अशी मागणी राज्य सरकारकडे केली असून व दोषी अधिकार्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली असून तसे निवेदन पोलीस अधिकारी जगदीश पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे.
यावेळी नारायणगाव जैन संघाचे सर्व ट्रस्टी , जैन सकल संघ व जैन सोशल क्लबचे पदाधिकारी तसेच जैन बांधव उपस्थित होते. निवेदनात मुंबई महानगर पालिकेच्या हद्दीतील विलेपार्ले येथील जैन समाजाचे जुने मंदिर महानगरपालिकेने बुलडोझर लावून उद्ध्वस्त केले. घटनेचा नारायणगाव जैन संघाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे.
जैन समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असल्याने घटनेचे तीव्र पडसाद जैन व अहिंसा प्रेमी समाजात उमटले आहे. जैन तीर्थंकर जगा आणि जगू द्या संदेशाचे नायक आहेत. त्यांच्या उपदेशाने देशात शांती व अहिंसेचा महामार्ग प्रशस्त झाला आहे. स्वातंत्र्य व लोकशाहीचे रक्षण करणार्या तीर्थंकर भगवान यांचे मंदिर उध्वस्त करून महानगरपालिका प्रशासनाने संविधानाने दिलेल्या उपासनेच्या जैन समाजाच्या हक्कावर गदा आणणे राज्य सरकार व महानगरपालिकेच्या प्रशासनास अशोभनीय असल्याचे जैन समाज बांधवांनी नमूद केले.
नारायणगाव जैन संघाच्या वतीने जैन मंदिर होते त्याच ठिकाणी पूर्ववत महानगरपालिकेने बांधून द्यावे व मंदिर उद्ध्वस्त करणार्या दोषद अधिकार्यांवर कारवाई करून निलंबित करावे अशी मागणी जैन समाजाच्या वतीने गृह विभागा मार्फत राज्य शासनाकडे करीत आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष विलास भळगट, अतुल कांकरिया यांनी दिली.





