पुणे जिल्हा | रोहित्र, केबल चोरीचा सपाटा सुरूच

सविंदणे (वार्ताहर)- शिरूर तालुक्याच्या बेट भागातील रोहित्र, केबल चोरीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. सविंदणे येथील डोंगर भागातील फटांगडे दऱ्यातील विद्युत रोहित्र (दि.३) रोजी पहाटेच्या सुमारास चोरीला गेले आहे. टाकळी हाजी ( ता.शिरूर) येथील शिनगरवाडीतील चार शेतकऱ्यांच्या कुकडी नदीवरील कृषी पंपाच्या केबलची चोरी झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
येथील अशोक सहादू पखाले, सखाराम गेणभाऊ खामकर, सणस विठोबा खामकर, बंडू पंढरीनाथ खामकर यांच्या कृषी पंपाच्या केबलची चोरी झाली आहे. (दि.१) सकाळी शेतकरी पंप सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना रात्री केबलची चोरी झाल्याचे निदर्शनास आले.
आधीच नदीला पाणी नाही, रात्रीत नदीला जमा झालेले थोडेफार पाणी सकाळी शेताला देवून कसेबसे पिक पाणी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न शेतकरी करीत असताना केबल चोरीने पुन्हा खर्च वाढल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात काम करत असताना वाढत्या तापमानात जीवाची परवा न करता या भागातील बळीराजा कष्ट करत आहेत. दुग्धव्यवसाय, तरकारी पिके घेवून प्रपंचासाठी पै पै गोळा करून उदरनिर्वाह करत असताना पुढील पिकासाठी तयार केलेले भांडवल या चोऱ्यांमुळे खर्च होत आहे.
चोरट्यांकडून रेकी करून हातसफाई
यापूर्वी बेट भागात अनेक विद्युत रोहित्र, शेतकऱ्यांच्या केबल चोरीस गेल्या असून त्याचा तपास करण्यात पोलीस मात्र अपयशी ठरल्याने चोरांचे मनोबल वाढले आहे, रोहित्र चोरताना त्याच वेळेस लाईट दीड तास गायब होते. यामध्ये नेमकी कोणाचा हात आहे हे शोधणे महत्वाचे आहे. पोलीस यंत्रणा या घटना गांभीर्याने घेत नसल्याने शेतकऱ्यांना, महावितरणला वाली कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पोलीस प्रशासन सुस्तावले
विद्युत रोहित्र तसेच कृषी पंप आणि केबल चोरी, शेतमाल व कृषी साहित्य चोरांना पोलीस कधी गजाआड करणार? या प्रकारांना अभय नक्की कुणाचे, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. बिबट्याची दहशत आणि चोरीचे वाढते प्रमाण यामुळे नागरिकांची झोप उडाली असून मलई खात पोलीस प्रशासन सुस्त झाले की काय..अशी दबक्या आवाजातील चर्चा ग्रामस्थांमधून ऐकावयास मिळत आहे.





