Rajendra Raut : “रोहित पिल्लू तू जास्त शहाणपणा…”; राजेंद्र राऊतांचा खोचक पलटवार! असं काय म्हणाले होते रोहित पवार?
Rajendra Raut : रोहित पवार यांच्या वक्तव्याला उत्तर देताना राजेंद्र राऊत यांनी बार्शीतील त्यांच्या प्रचारसभेतील उपस्थितीवर प्रश्न उपस्थित केले.

Rajendra Raut : राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. विविध मतदारसंघांमध्ये उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला असून, राजकीय नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपही वाढताना दिसत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यात शाब्दिक संघर्ष रंगला आहे. एमपीएससी आंदोलनाच्या वेळी राजेंद्र राऊत यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर बार्शी दौऱ्यावर असताना रोहित पवार यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला. आता त्यांच्या टीकेला राजेंद्र राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
‘त्यांना उत्तर देण्यासाठी प्रवक्ता ठेवला आहे’; रोहित पवारांचा टोला
बार्शी दौऱ्यादरम्यान रोहित पवार यांनी राजेंद्र राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना म्हटले होते की, “मी मंत्री-मुख्यमंत्री अशा माझ्या लेव्हलच्या व्यक्तींवर बोलतो. ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही विचारलं, त्यावर बोलण्यासाठी मी पाचवतीला एक प्रवक्ता घेतला आहे. तो प्रवक्ता त्यांना उत्तर देईल.”
रोहित पवार यांच्या या वक्तव्यानंतर राजेंद्र राऊत यांनीही त्यांच्यावर जोरदार टीका केली. बार्शीतील राजकारण, प्रचारसभा आणि पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील प्रचाराला मिळालेला प्रतिसाद या मुद्द्यांवरून त्यांनी पवार यांना लक्ष्य केले.
राजेंद्र राऊतांचा पलटवार; प्रचारसभेतील उपस्थितीवरून सवाल
रोहित पवार यांच्या वक्तव्याला उत्तर देताना राजेंद्र राऊत यांनी बार्शीतील त्यांच्या प्रचारसभेतील उपस्थितीवर प्रश्न उपस्थित केले. रोहित पवार यांनी बार्शीत येऊन केलेल्या प्रचाराचा संदर्भ देत त्यांनी सभेला किती लोक उपस्थित होते, तसेच शिक्षक आणि पदवीधर मतदारांनी किती प्रतिसाद दिला, असा सवाल केला.
राऊत म्हणाले की, “रोहित पिल्लू तू जास्त शहाणपणा करण्याचा प्रयत्न करू नको. बार्शी आणि राऊतांचा नाद करू नको. लेव्हल लेव्हल काय म्हणतो तुझ्यासारखे सतराशे साठ आम्ही पाहिलेत. तुझ्या खानदानला विचार राजा राऊत काय चीज आहे.” असा बोचरा पलटवार आमदार राजेंद्र राऊत यांनी रोहित पवार यांच्यावर केला.
रोहित पवार आता काय उत्तर देणार?
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर केलेल्या टीकेची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. आता राजेंद्र राऊत यांच्या खोचक टीकेला रोहित पवार काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
DELHI POLICE: सीजेपीचे सौरव-रांका आणखी एका संकटात ; ‘हे’ प्रकरण आता गुन्हे शाखेकडे वर्ग





