Border-Gavaskar Trophy 2024/25 : भारतीय फलंदाजी हे सर्वात मोठे आव्हान – नॅथन लायन

Border-Gavaskar Trophy 2024/25 :- कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली व ऋषभ पंत हे तीनही फलंदाजांचे आगामी बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियासाठी मोठे आव्हान असल्याचे ऑस्ट्रेलिया संघाचा फिरकी गोलंदाज नॅथन लायनने म्हटले आहे.
पाच कसोटी लढतींच्या मालिकेला २२ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिली कसोटी पर्थ येथे खेळविण्यात येणार आहे. त्यानंतर अनुक्रमे अडलेड,ब्रिस्बेन, मेलबर्न व सिडनी येथे लढती असणार आहेत. ऑस्ट्रेलिया संघाने २०१४-१५ पासून बॉर्डर-गावस्कर चषकावर आपले नाव कोरले नाही. मात्र भारतीय संघाने २०१८-१९ व २०२०-२१ मध्ये ऑस्ट्रेलियाला संघाला त्यांच्याच देशात जाऊन पराभूत करण्याची किमया केली आहे. विश्व कसोटी क्रमवारीत भारत सध्या पहिल्या तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे.
या आगामी मालिकेबाबत बोलताना ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायन म्हणाला की, भारताकडे रोहित शर्मा, विराट कोहली व ऋषभ पंत यांच्यासारखे दिग्गज खेळाडू आहेत. हे खेळाडू कोणताही सामना एकहाती फिरविण्याही क्षमता राखून आहेत. त्यामुळे या खेळाडूंचे मोठे आव्हान ऑस्ट्रेलिया संघासमोर आहे. गतवेळी झालेल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेत रोहित शर्माने नागपूरमध्ये शतकी खेळी करताना संघाला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर दिल्ली येथे झालेल्या लढतीमध्ये विराट कोहलीने १८६ धावांची बिनतोड खेळी केली होता. या दोन्ही खेळी ऑस्ट्रेलियाच्या पराभवाचे कारण ठरल्या होत्या. दिल्लीतील लढतीत शुभमन गिलने देखील शतक झळकावले होते.
Nathan Lyon said “Rohit Sharma, Virat Kohli, Rishabh Pant are probably going to be really big 3 ones in BGT – they still got Jaiswal, Gill, Jadeja – it’s going to be a massive challenge”. [Star Sports] pic.twitter.com/HiuUls25H4
— Johns. (@CricCrazyJohns) September 11, 2024
रोहित आणि विराट यांच्याबरोबरीने भारताचे युवा फलंदाज असलेले यशस्वी जैस्वाल व शुभमन गिल हे देखील या मालिकेमध्ये चमकदार कामगिरी बजावू शकतील. त्यामुळे रोहित, विराट आणि ऋषभ यांच्या बरोबरीने यशस्वी व शुभमन गिल या फलंदाजापासून देखील सावध राहावे लागणार असल्याचे लायन बोलताना म्हणाला.
भारतीय गोलंदाजीचा मुकाबला सोपा नाही…
यावेळी बोलताना फिरकीपटू लायनने भारताच्या गोलंदाजांचे देखील कौतुक केले. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना भारताच्या वेगवान व फिरकी अशा दोन्ही गोलंदाजासाठी वेगळी रणनीती बनवावी लागणार आहे. भारतीय गोलंदाजीचा मुकाबला करणे सोपे नाही. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाना अतिशय संयमाने खेळावे लागणार आहे. भारतीय संघात चांगले फिरकी आणि वेगवान गोलंदाजाचा भरणा आहे.
लायन इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर
ऑस्ट्रेलियाचा लायन हा विश्वकसोटी स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. विश्वकसोटीमध्ये त्याने आतापर्यंत १८७ गडी बाद केले आहेत. या स्पर्धेत आतापर्यंत एकही गोलंदाजाला २०० बळींचा टप्पा गाठता आलेला नाही. नॅथन लायनकडे इतिहास रचण्याची चांगली संधी असणार आहे. या विक्रमासाठी त्याला अजून १३ कसोटी बळींची आवश्यकता आहे. ही स्पर्धा ऑस्ट्रेलियात असल्याने, ३६ वर्षांच्या लायनला हा विक्रम मायदेशात नोंदविता येऊ शकतो.
वर्ष : मालिका विजय
२०११-१२ : ऑस्ट्रेलिया ४-०
२०१२-१३ : भारत ४-०
२०१४-१५ : ऑस्ट्रेलिया २-०
२०१६-१७ : भारत २-१
२०१८-१९ : भारत २-१
२०२०-२१ : भारत २-१
२०२२-२३ : भारत २-१





