ICC Cricket World Cup 2023 & Revenue India Economy : एकदिवसीय विश्वचषक 2023 भारतात खेळवण्यात आला होता, पण टीम इंडियाला अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 6 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. यासह ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे विश्वविजेतेपद पटकावले होते. ज्यानंतर कोट्यवधी भारतीयांची मने तुटली. टीम इंडिया जरी वनडे विश्वचषक जिंकू शकली नसली तरी याचा भारतीय अर्थव्यवस्थेला खूप मोठा फायदा झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आर्थिक अहवाल प्रसिद्ध केला आहे ज्यामध्ये 2023 एकदिवसीय विश्वचषक कमाईच्या बाबतीत इतिहासातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असल्याचे सिद्ध झाले आहे. याच अहवालात एक मोठा खुलासा करण्यात आला आहे की, भारतीय अर्थव्यवस्थेला एकदिवसीय विश्वचषकातून 1.39 अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे 11,637 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. ही स्पर्धा 2023 मध्ये 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली होती. दिल्ली, मुंबई आणि चेन्नईसह एकूण 10 शहरांना विश्वचषक सामन्यांचे यजमान हक्क देण्यात आले होते. आयसीसी आणि बीसीसीआयने वर्ल्ड कपमध्ये थेट गुंतवणूक केली होती. त्यांच्याशिवाय राज्यांच्या क्रिकेट संघटनांनीही भारतीय अर्थव्यवस्थेत विविध क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. मात्र, ही रक्कम विश्वचषकातील संपूर्ण कमाई आहे का, हे आयसीसीने स्पष्ट केलेले नाही. पर्यटनातून भरघोस नफा…. ज्या शहरांमध्ये वर्ल्डकपचे सामने खेळले गेले त्या शहरांमध्ये पर्यटनाच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली. विश्वचषकादरम्यान निवास, खाद्यपदार्थ, प्रवास आणि वाहतूक यासह पर्यटनाने US$ 861.4 दशलक्ष किंवा सुमारे 7,231 कोटी रुपये कमावले. यावेळी एकूण 1.25 दशलक्ष म्हणजेच 12 लाख 50 हजार लोक विश्वचषक थेट पाहण्यासाठी आले होते, हाही एक विक्रम होता. ICC Test Rankings : इंग्लंड-श्रीलंका कसोटी मालिकेनंतर क्रमवारीत मोठी उलथापालथ..! रोहित, विराट अन् जैस्वालला न खेळताही झाला फायदा…. परदेशी प्रवाशांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेलाही फायदा झाला आहे. परदेशी प्रवाशांची निवास व्यवस्था, विविध शहरांचा प्रवास आणि इतर गोष्टींद्वारे 2,360 कोटी रुपये कमाई झाली आहे. 68 टक्के परदेशी प्रवाशांनी असेही सांगितले की, ते निश्चितपणे त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईकांना भारतात येण्यास सांगतील. बहुतेक परदेशी प्रवाशांनी भारतात 5 रात्री घालवल्या, तर भारतीय देखील एका शहरात सरासरी 2 रात्री राहिले.