Rohit Sharma : ‘मुबंईचा राजा म्हणू नका…’, रोहित शर्माने हात जोडून चाहत्यांना केलं आवाहन, पाहा VIDEO

Rohit Sharma Viral Video : भारतीय वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तो नुकताच मुंबईतील वरळी येथे भगवान गणेशाच्या पूजेसाठी गेला होता. तिथे रोहितच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली. पूजेच्या वेळी चाहत्यांनी ‘मुंबईचा राजा रोहित शर्मा’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. मात्र, यामुळे रोहितला अजिबात आनंद झाला नाही. त्याने तात्काळ चाहत्यांना घोषणा थांबवण्याची विनंती केली. प्रथम त्याने एका हाताने इशारा केला आणि नंतर दोन्ही हात जोडले. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
‘हिटमॅन’ या नावाने प्रसिद्ध असलेला रोहित कसोटी आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. 38 वर्षीय या फलंदाजाच्या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने लिहिले, “रोहित शर्माची नम्रता कोणत्याही घोषणेपेक्षा मोठी आहे. इतके यश मिळूनही तो अहंकारापेक्षा आदराला प्राधान्य देतो. तो मैदानावर आणि मैदानाबाहेर खरा राजा आहे.”
चाहत्यांच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष –
Rohit Sharma stops fans from chanting ‘Mumbai Cha Raja, Rohit Sharma’ at Bappa’s pandal. ❤️ pic.twitter.com/ztWwAAuOoY
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 6, 2025
दुसऱ्या युजरने टिप्पणी केली, “रोहितने दाखवून दिले की खरा राजा तोच आहे, जो स्वतःला नव्हे तर बाप्पाला प्रथम स्थान देतो.” तिसऱ्या युजरने लिहिले, “रोहित शर्मा खूप चांगला, सुसंस्कृत आणि धार्मिक व्यक्ती आहे. मला तो खूप आवडतो.” आणखी एकाने म्हटले, “गणपती पंडालात रोहित शर्मा म्हणाला, ‘माझ्या नावाने ओरडू नका, बाप्पाचे नाव घ्या.’ याला म्हणतात खरा आदर.” रोहित शेवटचा भारतासाठी मार्च 2025 मध्ये खेळला, जेव्हा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना झाला.
रोहित शर्माची कारकीर्द –
रोहितच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला. ‘हिटमॅन’ने अंतिम सामन्यात सर्वाधिक 76 धावा केल्या आणि सामनावीर म्हणून निवडला गेला. रोहित आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पुन्हा खेळताना दिसेल. भारताला 19 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. त्याने आतापर्यंत भारतासाठी 273 एकदिवसीय सामन्यांमध्ये 48.76 च्या सरासरीने 11,168 धावा केल्या आहेत, ज्यात 32 शतके आणि 58 अर्धशतकांचा समावेश आहे.





