Rohit Sharma : रोहित शर्माची कमाल! तब्बल २० किलो वजन घटवत ब्रोंको टेस्ट केली पास, चाहतेही झाले चकित

Rohit Sharma loss 20 Kg Weight : भारतीय वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. अलीकडेच त्याने आपल्या फिटनेसवर प्रचंड मेहनत घेतली असून, अवघ्या काही महिन्यात तब्बल 20 किलो वजन कमी करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, रोहितने बीसीसीआयने लागू केलेला नवीन फिटनेस चाचणी, अर्थात ‘ब्रोंकोटेस्ट’, यशस्वीरीत्या पास केली आहे. ही चाचणी अत्यंत कठीण मानली जाते, परंतु रोहितने ती उत्तमरित्या पूर्ण करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. त्याचा हा फिटनेस भारतीय संघासाठी खेळण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे दर्शवते.
रोहित शर्मा वाढलेल्या पोटामुळे झाला होता ट्रोल –
काही काळापूर्वी रोहित शर्मा त्याच्या फिटनेसवरून सोशल मीडियावर ट्रोल झाला होता. विमानतळावरून बाहेर पडताना त्याचे वाढलेले पोट चर्चेचा विषय बनला होता. त्याच्या वाढलेल्या वजनामुळे अनेकांनी त्याच्या 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्याच्या खेळण्याच्या क्षमतेवरही शंका व्यक्त केली गेली होती. मात्र, रोहितने ब्रोंकोफिटनेस टेस्ट यशस्वीरीत्या पूर्ण करून ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे. इतकेच नव्हे, तर क्रिकेट खेळण्यासाठी तो शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे.
नक्की काय आहे ब्रोंको टेस्ट?
ब्रोंको टेस्ट ही रग्बी खेळात वापरली जाते. यामध्ये खेळाडूला प्रथम 20 मीटर शटल धाव पूर्ण करावी लागते, त्यानंतर 40 मीटर आणि 60 मीटर धावावे लागते. या तिन्ही धावांचा एक संच तयार होतो आणि खेळाडूला न थांबता असे 5 संच पूर्ण करावे लागतात. यासाठी 6 मिनिटांची वेळमर्यादा आहे, ज्यामध्ये खेळाडूला एकूण सुमारे 1200 मीटर धावावे लागते. ही चाचणी बंगळुरु येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सिलन्स येथे सुरू झाली असून, काही वरिष्ठ खेळाडूंनी येथे ही चाचणी दिली आहे.
हेही वाचा – Pat Cummins : पॅट कमिन्सचा अॅशेस मालिकेसाठी जीवतोड प्रयत्न: तंदुरुस्तीचा धोका पत्करणार?
रोहितच्या फिटनेसने चाहत्यांमध्ये उत्साह –
रोहित शर्माने अल्पावधीतच आपल्या फिटनेसमध्ये सुधारणा करुन सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. त्याच्या चाहत्यांमध्ये त्याच्या क्रिकेटमधील पुनरागमन आणि आगामी सामन्यांबाबत प्रचंड उत्साह आहे. ब्रोंको टेस्ट यशस्वीरीत्या पूर्ण करणे ही रोहितसाठी मोठे यश आहे. ही चाचणी कठीण असली तरी, खेळाडूंची फिटनेस तपासण्याचा आणि भविष्यातील सामने जिंकण्यासाठी आवश्यक असलेली तयारी सुनिश्चित करण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे.





