Rohit Breaks Silence : ऐतिहासिक शतकानंतर रोहित शर्माने टीकाकारांनाची बोलती केली बंद; म्हणाला, “बाकी कोण काय बोलतं, याला मी…”
Rohit Breaks Silence : या ऐतिहासिक कामगिरीनंतर रोहितने पहिल्यांदाच आपले मौन सोडले असून, टीकाकारांचा खरपूस समाचार घेतला आहे.

Rohit Sharma Break Silence after smashed Century Lords : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात भारतीय संघाचा निसटता पराभव झाला असला, तरी हा सामना रोहित शर्माच्या अविस्मरणीय खेळीसाठी इतिहासात नोंदवला गेला आहे. निवृत्तीच्या जोरदार चर्चा आणि चहूबाजूंनी होणाऱ्या टीकेला अत्यंत सडेतोड उत्तर देत रोहित शर्माने लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर एक वादळी शतक ठोकले. या शतकासह लॉर्ड्सच्या मैदानावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा तो पहिलाच भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. या ऐतिहासिक कामगिरीनंतर रोहितने पहिल्यांदाच आपले मौन सोडले असून, बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये टीकाकारांचा खरपूस समाचार घेतला आहे.
“बाकी कोण काय बोलतं, याला मी महत्त्व देत नाही!” (Rohit Breaks Silence )
बीसीसीआयने पोस्ट केलेल्या अधिकृत व्हिडीओमध्ये आपल्या पुढील वाटचालीचे संकेत देत रोहित शर्मा म्हणाला, “मी माझ्या संपूर्ण कारकिर्दीत केवळ एकाच गोष्टीकडे प्राधान्याने लक्ष दिले आहे आणि ती गोष्ट म्हणजे मैदानावरील माझी कामगिरी. बाहेर बसून कोण माझ्याबद्दल काय बोलतो, काय चर्चा करतो, याला मी फारसे महत्त्व देत नाही. बॅटद्वारे संघासाठी धावा करणे हे फलंदाज म्हणून माझे एकमेव काम आहे.”
पदार्पणापासूनच्या टीकेवर रोहितचे भाष्य – (Rohit Breaks Silence)
He was the most-talked about cricketer before the Lord’s ODI and he still remains the most-talked about after his scintillating hundred 🙌
🎥 Hear from the man himself as he soaked everything in to produce a masterclass 🫡 – By @RajalArora #TeamIndia | @ImRo45…
— BCCI (@BCCI) July 20, 2026
आपल्या प्रवासाबाबत बोलताना रोहित पुढे म्हणाला, “मैदानावर उतरायचे, आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करायचे आणि संघाला जिंकवून देण्यासाठी खेळायचे, ही जबाबदारी पदार्पणापासूनच माझ्यावर सोपवण्यात आलेली आहे आणि मी ती सातत्याने प्रामाणिकपणे पार पाडत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून माझ्याबाबत नेहमीच वेगवेगळ्या उलट-सुलट चर्चा होत राहिल्या आहेत. कधी माझ्या खराब फॉर्मबाबत प्रश्न उपस्थित केले गेले, कधी माझ्या कर्णधारपदाबाबत शंका घेतली गेली, तर कधी कारकिर्दीच्या भवितव्याबाबत सवाल करण्यात आले. मात्र, या सर्व बाह्य गोष्टींना मी कधीही माझ्या खेळापेक्षा वरचढ होऊ दिलेले नाही.”
टीकाकारांची बोलती बंद; ३०० व्या सामन्याकडे कूच –
निवड समिती आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासोबतच्या कथित वादाच्या पार्श्वभूमीवर रोहितने ठोकलेले हे शतक त्याचे वनडे क्रिकेटमधील स्थान अबाधित राखणारे ठरले आहे. लॉर्ड्सवर ३६ वर्षांनंतर इंग्लंडच्या सलामीवीरांनी केलेल्या विक्रमी शतकी खेळीला रोहितने भारतीय डावात चोख प्रत्युत्तर दिले. या शतकामुळे तो आपल्या ३०० व्या एकदिवसीय सामन्याच्या ऐतिहासिक टप्प्याच्या आणखी जवळ पोहोचला असून, तो २०२७ च्या विश्वचषकापर्यंत खेळत राहणार याचे स्पष्ट संकेत या व्हिडीओतून मिळाले आहेत.





