रोहित पवारांचं सदाभाऊ खोतांना एका वाक्यात प्रत्युत्तर; म्हणाले ज्यांच्या दुधातच…

मुंबई : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खोचक पद्धतीने टीका केली आहे. यावेळी खोत यांनी “शरद पवारांनी आयुष्यभर काड्या करण्याचं आणि आग लावण्याचं काम केले. त्यामुळे त्यांचे आडनाव बदलून आगलावे ठेवावे” असे म्हटले आहे.
सांगलीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यासंबंधी बोलताना खोत यांनी शरद पवारांवर ही टीका केली. याला आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी चोख प्रत्युत्तर देत सदाभाऊ खोत यांचा समाचार घेतला.
रोहित पवार यांनी सदाभाऊ खोत यांचा जुना व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात सदाभाऊ खोत राजू शेट्टी यांच्या दूध आंदोलनाबाबत बोलत आहेत. दुधात काय भेसळ असते? किती पाणी असतं मला चांगलं माहिती आहे? तसेच अशा प्रकारचे आंदोलन करूनच आपण इथपर्यंत पोहोचलो असल्याचंही सदाभाऊ खोत व्हिडिओमध्ये बोलताना दिसतात.
तोच व्हिडिओ आमदार रोहित पवारांनी ट्विट केला असून ज्यांच्या दुधात पाणी आहे, त्यांची वाणी कशी काय शुद्ध असू शकते, असा प्रश्न उपस्थित करत पलटवार त्यांनी केला आहे.





