NCP Sharad Pawar : रोहित पवारांचा संकेत खरा ठरला! शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मोठे फेरबदल
NCP Sharad Pawar : पक्षाच्या युवक आघाडीचे अध्यक्ष मेहबूब शेख आणि विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष सुनील गव्हाणे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर पक्षाने नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

NCP Sharad Pawar : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच याबाबतचे संकेत आमदार रोहित पवारांनी कार्यक्रमातून बोलताना दिले होते. त्यानुसार पक्षात नवनियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
विद्यार्थी आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी सुशील बेर्डे
पक्षाच्या युवक आघाडीचे अध्यक्ष मेहबूब शेख आणि विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष सुनील गव्हाणे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर पक्षाने नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्यानुसार विद्यार्थी आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी सुशील बेर्डे यांची नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली.
पक्षाचे युवक अध्यक्षपद शहर आणि ग्रामीण अशा दोन भागात विभागून देण्यात आले आहेत. युवकच्या शहरसाठीच्या प्रदेशाध्यक्ष पदी विशाल वाकडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र युवती अध्यक्ष पद देताना देखील बदल करत शहर आणि ग्रामीणसाठी अध्यक्ष निवड करण्यात आली आहे. त्यानुसार मनाली भिलारे शहरच्या युवती प्रादेशाध्यक्षा तर अमृता कालदाते ग्रामीणसाठी प्रदेशाध्यक्षा म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. विशाल शंकर वाकडकर यांची प्रदेशाध्यक्ष (शहर), महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्ती करून शहर आणि ग्रामीण भागावर समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
शरद पवारांनी भाकरी फिरवली
सध्या राज्यात कोणत्याही निवडणुकात नाहीत. मात्र, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल करण्यात आल्याने याविषयीची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या नव्या नियुक्त्यांवरुन पवारांनी पक्षातील तरुण नेतृत्वाला संधी देत भाकरी फिरवल्याचे बोलले जात आहे. या नव्या पदाधिकाऱ्यांवर पक्ष संघटना वाढवणे ही सर्वात महत्वाची जबाबदारी असणार आहे.





