Rohit Pawar : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यशैलीची आठवण ताजी करत त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांच्या पद्धतीनुसार आता रोहित पवार दर मंगळवारी ‘जनता दरबार’ भरवणार असून नागरिकांच्या तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या समस्या थेट ऐकून घेणार आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून याबाबत अधिकृत पत्रक जाहीर करण्यात आले आहे. रोहित पवार हे पक्षाचे सरचिटणीस असून २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते १० या वेळेत मुंबईतील प्रदेश कार्यालयात पहिला जनता दरबार आयोजित करण्यात येणार आहे. अधिवेशन काळ संपल्यानंतर दर मंगळवारी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत नियमितपणे हा दरबार भरवण्यात येणार आहे. जनता दरबाराचा वारसा कायम अजित पवार यांची कामाची शैली राज्यात विशेष ओळखली जायची. पहाटेपासून कामाला सुरुवात करून लोकांच्या समस्या तत्परतेने सोडवण्याची त्यांची प्रतिमा होती. दर मंगळवारी जनता दरबार घेऊन सर्वसामान्य नागरिकांना थेट भेटण्याची परंपरा त्यांनी सुरू ठेवली होती. नियमात बसणारी कामे शंभर टक्के पूर्ण करण्याची त्यांची ख्याती होती. आता त्याच परंपरेचा वारसा रोहित पवार पुढे नेत असल्याचे चित्र आहे. अधिवेशनात भावूक क्षण राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अजित पवारांना आदरांजली वाहताना रोहित पवार भावूक झाल्याचे दिसून आले. अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांना हुंदका आवरता आला नाही. दरम्यान, अजित पवारांच्या विमान दुर्घटनेबाबत रोहित पवार यांनी सातत्याने प्रश्न उपस्थित केले आहेत. पत्रकार परिषदांच्या माध्यमातून त्यांनी या प्रकरणातील तपास योग्य दिशेने व्हावा, अशी मागणी केली असून केंद्रीय उड्डाण मंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी त्यांनी केली आहे.