मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात सत्तासंघर्षाचा दुसरा अंक सर्वांना पाहायला मिळाला. बंडखोरीनंतर अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ‘घड्याळ’ या पक्षचिन्हावर दावा केला आहे. याबाबतचे पत्रही निवडणूक आयोगाला दिले आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले आहेत. अशात मुंबईतील बैठकीतअजित पवारांनी शरद पवारांवर अनेक गंभीर आरोप केले. आता याच आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देत मोठा दावा केला आहे. रोहित पवार म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर मुंबईत बंडखोरांची जी बैठक झाली आणि भाषणं झाली. त्यात शरद पवारांवर ज्यापद्धतीने बोललं गेलं त्यामुळे त्या कार्यक्रमाला गेलेले आमदार आणि पदाधिकारीही भावनिक झाले. त्यांची आपण चूक केली की काय अशी भावना झाली.”असेही रोहित पवार म्हणाले आहे. माध्यमांशी बोलताना म्हणाले,’शरद पवारांवर विश्वास ठेऊन जे आमदार या बाजूला आलेले आहेत ते आपआपल्या मतदारसंघात काम करत आहेत. या गटातील आमदारांमध्येच नाही, तर तिकडे गेलेल्या आमदारांमध्येही शरद पवारांविषयी एक भावना आहे,” असं मत पवार यांनी व्यक्त केलं.