Rohit Pawar : दारू कांडात रोहित पवार मैदानात! हडपसरमधील बनावट दारूचा अड्डा फोडला; पोलिसांवर गंभीर आरोप
Rohit Pawar : हडपसरमधील मृत यशवंत पवार आणि अरुण दादर यांच्या कुटुंबाची रोहित पवारांनी घेतली भेट; विषारी दारू प्रकरणावरून शासन-प्रशासनाला घेरले.

Rohit Pawar – हडपसर भागातील बनावट दारूमुळे मृत्यू झालेल्या यशवंत पवार आणि अरुण वामन दादर यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन घडलेल्या घटनेची माहिती आमदार रोहित पवार यांनी घेतली. यशवंत पवार यांचा विषारी दारूमुळे मृत्यू झाला असताना निर्ढावलेल्या पोलीस आणि आरोग्य यंत्रणांनी पिडीत कुटुंबाला मृत्यूचे खोटं कारण का सांगितलं, हे उघड झालं पाहिजे, असे पवार म्हणाले.
स्थानिक पोलीस आणि बनावट दारू बनवणाऱ्यांच्या अभद्र युतीमुळेच आज पुण्यातील ही कुटुंबं अक्षरशः उद्ध्वस्त झाली असून, हे मृत्यू म्हणजे पोलीस यंत्रणेच्या मदतीने घडवून आणलेले खूनच आहेत, ही पीडितांची भावना खोटी नाही. गुन्हा करणाऱ्यांसोबत पार्ट्या, कोयता गँगसोबत अवैध संबंध आणि दिवसाढवळ्या पोलिसांच्या वेशात होत असलेली दरोडेखोरी यामुळे विकसित पुण्याची वाटचाल आज गुन्हेगारांच्या शहराकडे होत आहे.
हे रोखण्यासाठीच आज हडपसर भागातील बनावट दारूचा अड्डा फोडला आहे. पीडितांना न्याय मिळाला नाहीतर हाच पॅटर्न सगळीकडे पहायला मिळेल, हे सरकारने लक्षात घ्यावं आणि बनावट दारूमुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत जाहीर करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पवार यांनी केली.





