Rohit Pawar | संयुक्त गट-ब परीक्षेची वयोमर्यादा शिथिल करा – आमदार रोहित पवार यांची मागणी

प्रभात वृत्तसेवा
पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) संयुक्त पूर्व परीक्षा (गट-ब) २०२५ द्वारे एकूण ६७४ पदे भरणार आहेत. त्यात पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाच्या ३९२ जागांचा समावेश आहे. वयोमर्यादेच्या अटीमुळे अनेकजण परीक्षेला अपात्र ठरण्याची शक्यता आहे.परीक्षेची जाहिरात २९ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध झाली असून, परीक्षा ९ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर होत आहे. आयोगाने वयोमर्यादा निश्चित करताना १ नोव्हेंबर २०२५ हा अंतिम दिनांक धरला आहे.
दरवर्षी ही जाहिरात डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात येते. त्या तुलनेत ही जाहिरात लवकर प्रसिद्ध झाल्याने अनेकांची वयोमर्यादा संपली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ज्यांची वयोमर्यादा २०२३ ते २०२५ मध्ये पार झाली आहे, त्यांना एकावेळची विशेष सवलत द्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे, एमपीएससीकडे पत्राद्वारे केली आहे.यापूर्वी शासनाने पोलिस भरती प्रक्रियेसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना अशीच एकवेळची संधी दिली होती. त्या आधारे या परीक्षेस सवलत द्यावी, अशी मागणी पवार यांनी केली आहे.





