रोहित पवारांची खोचक पोस्ट,’सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी ?’

Rohit Pawar । अजित पवार गटाचे नेते अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या जागेवर अर्ज भरण्यासाठी केवळ एक दिवस बाकी आहे. असे असताना अद्याप अजित पवार गटाकडून कोणत्याही उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.
मात्र गुरुवार शेवटचा दिवस असल्याने आज राष्ट्रवादीच्या उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी राष्ट्रवादीत सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याचे समोर आले आहे. राज्यसभा निवडणुकीच्या चर्चांवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी खोचक पोस्ट केली आहे.
आदरणीय पवार साहेबांना सोडून एक वेगळं घर वसवलं गेलं असलं तरी त्या घरातील आजची परिस्थिती आणि तिथल्या लोकांची अस्वस्थता बघता सर्वजण किती दिवस एकत्र राहतील हे ब्रम्हदेवही सांगू शकणार नाही.. त्यामुळं पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालण्यापेक्षा घरातल्या विश्वासू व्यक्तीला दिली तरच ती…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 12, 2024
Rohit Pawar । नेमकं काय म्हणाले रोहित पवार ?
रोहित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये राज्यसभा उमेदवारीचा उल्लेख करतानाच सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची नावंही घेतली आहेत. मात्र, पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालण्यापेक्षा घरातील विश्वासू व्यक्तीला ती दिली तर टिकेल, असंही ते म्हणाले आहेत. त्यामुळे त्यांनी नेमका टोला कुणाला लगावला आहे? यावरून तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.
“शरद पवारांना सोडून एक वेगळं घर वसवलं गेलं असलं, तरी त्या घरातील आजची परिस्थिती आणि तिथल्या लोकांची अस्वस्थता बघता सर्वजण किती दिवस एकत्र राहतील, हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही. त्यामुळे पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालण्यापेक्षा घरातल्या विश्वासू व्यक्तीला दिली, तरच ती टिकेल. इतरांचा काही भरवसा नाही अशी चर्चा चालू आहे”, असं रोहित पवारांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, या पोस्टच्या शेवटी रोहित पवारांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. “..म्हणूनच सुनेत्राकाकी किंवा पार्थ यांना आधीच शुभेच्छा आणि अभिनंदन”, असं रोहित पवार म्हणाले आहेत.





