Ram Shinde Vs Rohit Pawar : कर्जत नगरपंचायत मध्ये आमदार रोहित पवार गटाचा गटनेता बदलण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. मात्र ही मागणी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सोमवारी फेटाळली. जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत गटनेता बदलाबाबत आ. रोहित पवार गटाची असणारी मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळून लावून गटनेते म्हणून संतोष मेहत्रे व उपनेते म्हणून सतीश पाटील यांची असणारे नेमणूक कायम ठेवलेली होती. जिल्हाधिकऱ्यांच्या आदेशाविरुद्ध अमृत काळदाते यांनी उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान पुन्हा याप्रकरणी निर्णय घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना आदेशित करण्यात आलेले होते. त्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे या अर्जावर सुनावणी झाली. सुनावणीत अर्जदार काळदाते यांनी दाखविलेली सभा झाली नसल्याची बाब अकरा नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्याचबरोबर अशा स्वरूपाची सभा झालेली नसेल तर जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणी सुनावणी घेण्याचा अधिकार असल्याची बाब व लोकशाही प्रक्रियेप्रमाणे बहुमताने गटनेता ठरविण्याचा नगरसेवकांना कायदेशीर अधिकार असल्याचा युक्तीवाद करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी गटनेता बदलाचा अर्ज फेटाळून लावण्याचे आदेश पारित केले. त्यामुळे संतोष मेहत्रे यांनी गटनेते म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या सर्व सदस्यांना बजावलेला व्हीप योग्य असल्याचे चित्र स्पष्ट झाले. या ११ नगरसेवकांतर्फे अॅड. गोरक्ष पालवे यांनी युक्तिवाद केला. त्यांना अॅड. गुरविंदर पंजाबी, सागर गरजे, रोहित बुधवंत, राहुल दहिफळे, विशाल वांढेकर, धनश्री खेतमाळीस, अपेक्षा बोरुडे यांनी सहाय्य केले.