Rohit Pawar : भाजपसाठी शिंदे-दादांची गरज संपली; रोहित पवार यांची टीका

मुंबई : भाजपला मित्रपक्षांची उपयुक्तता संपली असून त्या कुबड्या आता अडकवल्या जातील की चुलीत घातल्या जातील हे पाहावे लागेल असा टोला राष्ट्रवादी(शप) चे आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती नसल्याने बोगस मतदारयाद्यांचा फटका आपल्याला बसेल अशी भीती महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिंदे गटाला आहे. त्यामुळेच त्यांच्या आमदारांची खदखद बाहेर येत असल्याची टीका रोहित पवार यांनी केली.
रोहित पवार यांनी सोशल मीडिया एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी भाजपचे मित्रपक्ष असलेल्या अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेवर टीका केली. बोगस मतदार यादीचा फटका आपल्याला बसेल अशी भीती या दोन्ही पक्षांना असल्याचे रोहित पवार म्हणाले. विधानसभेला गारगार वाटणाऱ्या मतदारयादींचा घोळ आता या मित्रपक्षांच्या अवघड जागेचे दुखणे झाल्याची टीका पवारांनी केली.
मित्रपक्षांच्या प्रत्येक गोष्टीत भाजप हस्तक्षेप करत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळेच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीत त्यांना दोन-दोन वेळा मिटिंग घ्यावी लागल्याचे ते म्हणाले. भाजपच्या दृष्टीने आता मित्रपक्षांची उपयुक्तता संपल्याचा दावाही रोहित पवारांनी केला. महायुतीत प्रचंड धुसफूस आहे. ही धुसफूस एवढी वाढली आहे की, निवडणुकीसाठी सुद्धा अजित दादांना दोन-दोनदा बैठका घ्याव्या लागत आहेत. सर्वच ठिकाणी भाजपा हस्तक्षेप करत असून भाजपसाठी दोन्ही मित्रपक्षांची उपयुक्तता संपल्याचीच ही चिन्हे दिसत असून अमित शाह साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कुबड्या काढून फेकण्याची ही नांदी म्हणावी लागेल.





