Rohit Pawar : भाजप समांतर मतदार पडताळणी करत आहे; रोहित पवार यांचा आरोप
मतदार याद्यांच्या सुरू असलेल्या विशेष सखोल पडताळणी (एसआयआर) प्रक्रियेदरम्यान भाजप आपल्या बूथ लेव्हल एजंट्सद्वारे समांतर मतदार पडताळणी मोहीम राबवत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शप) चे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला.

Rohit Pawar : मतदार याद्यांच्या सुरू असलेल्या विशेष सखोल पडताळणी (एसआयआर) प्रक्रियेदरम्यान भाजप आपल्या बूथ लेव्हल एजंट्सद्वारे समांतर मतदार पडताळणी मोहीम राबवत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शप) चे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला. त्यांनी निवडणूक आयोगाला या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली.
महाराष्ट्रात ३० जून रोजी एसआयआर मोहिमेला सुरुवात झाली. एक्सवरील एका पोस्टमध्ये पवारांनी (Rohit Pawar) आरोप केला की, पश्चिम बंगालमधील पुनरावृत्ती प्रक्रियेदरम्यान विरोधी राजकीय विचारसरणी असलेल्या मतदारांची नावे वगळण्यात आली किंवा ती इतर ठिकाणी हलवण्यात आली.
निवडणूक आयोग जेव्हा अधिकृत सरकारी यंत्रणेद्वारे एसआयआर मोहीम राबवत आहे, तेव्हा भाजपने त्याच वेळी आपल्या एजेंटद्वारे आपली स्वतःची यंत्रणा कार्यान्वित केली आहे. एका ऑनलाइन लिंकद्वारे ते मतदारांच्या नावांसमोर आमचे, संशयास्पद आणि विरोधी असे तीन पर्याय उपलब्ध करून देत आहेत आणि त्यानुसार मतदारांचे वर्गीकरण केले जात आहे, असे त्यांनी (Rohit Pawar) नमूद केले.
जेव्हा एसआयआर प्रक्रिया निवडणूक आयोगाद्वारे राबवली जात आहे, तेव्हा भाजप समांतर पडताळणी यंत्रणा कशी काय चालवू शकते? तसेच, संशयास्पद किंवा विरोधी म्हणून वर्गीकृत केलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाण्याचा किंवा इतरत्र हलवली जाण्याचा धोका आहे का?, असा प्रश्नही त्यांनी केला.
भाजप कोणत्या कायदेशीर अधिकाराखाली असा उपक्रम राबवत आहे?. समांतर पडताळणीसाठी मतदारांच्या वैयक्तिक किंवा गोपनीय नोंदींचा स्वतंत्रपणे वापर करण्याचा राजकीय पक्षांना कोणताही कायदेशीर अधिकार नाही, असे त्यांनी (Rohit Pawar) दावा केला. त्यांनी भाजपला या प्रश्नांची उत्तरे देण्याची मागणी केली.






