Rohit Pawar : ED ने आरोपपत्र दाखल केल्यानंतर रोहित पवारांनी ठोकला शड्डू; म्हणाले…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर महाराष्ट्र सहकारी बँक (MSCB) घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सप्लिमेंटरी आरोपपत्र दाखल केले आहे. याप्रकरणी बारामती ॲग्रो लिमिटेडशी संबंधित ५०.२० कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली असून, यामध्ये कन्नड (औरंगाबाद) येथील १६१.३० एकर जमीन, साखर कारखाना, यंत्रसामग्री आणि इमारत यांचा समावेश आहे. ईडीने ही मालमत्ता ‘गुन्ह्याच्या उत्पन्ना’चा भाग असल्याचा दावा केला आहे.
रोहित पवार (Rohit Pawar) यांनी या कारवाईला राजकीय दबावाचा भाग असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सांगितले की, २००९ मध्ये कन्नड सहकारी साखर कारखान्याने MSCB कडून ८०.५६ कोटींचे कर्ज घेतले होते. या कर्जाची परतफेड न झाल्याने २०१२ मध्ये बँकेने ही मालमत्ता ताब्यात घेऊन लिलाव केला. बारामती ॲग्रोने तिसऱ्या टेंडर प्रक्रियेत हा कारखाना ५० कोटींना खरेदी केला. पवार यांचा दावा आहे की, या प्रक्रियेत कोणतीही अनियमितता झालेली नाही आणि लिलाव प्रक्रिया MSCB च्या प्रशासकीय मंडळाने पारदर्शकपणे केली होती, ज्याची नियुक्ती रिझर्व्ह बँकेने केली होती.
ईडीच्या कारवाईवर रोहित पवार यांचा आक्षेप
रोहित पवार यांनी ईडीच्या कारवाईवर तीव्र आक्षेप नोंदवताना सांगितले की, २०११ मध्ये नाबार्डच्या अहवालात १०० जणांची नावे होती, त्यापैकी ९७ जणांची नावे ईडीच्या आरोपपत्रात समाविष्ट आहेत. मात्र, त्यावेळी त्यांचे नाव यात नव्हते. तरीही, राजकीय दृष्टिकोनातून केवळ त्यांच्यावरच कारवाई केली जात असल्याचा त्यांचा दावा आहे. “माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार आणि त्यांच्या एजन्सीमार्फत होत आहे. पण मी मराठी माणूस आहे, दिल्लीसमोर झुकणार नाही,” असे पवार यांनी ठणकावून सांगितले.
त्यांनी पुढे म्हटले की, ईडीने त्यांची १२-१२ तास चौकशी केली, पण त्यांना काहीही सापडले नाही. “आम्ही कोणतीही चूक केलेली नाही. त्यामुळे मला विश्वास आहे की, खालच्या न्यायालयापासून सुप्रीम कोर्टापर्यंत ही लढाई मी जिंकेन,” असे त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले. तसेच, कन्नड कारखाना शेतकऱ्यांसाठी आणि कामगारांसाठी आहे आणि त्यांना कोणतीही अडचण येणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
राजकीय दबाव आणि पक्षांतर
रोहित पवार यांनी आरोप केला की, ९७ जणांपैकी काही लोक भाजप, अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. मात्र, केवळ त्यांच्यावरच कारवाई होत असल्याने यामागे राजकीय हेतू आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबीयांना आणि नेत्यांना आयकर विभागाच्या नोटिसा मिळाल्याचा उल्लेख करत सत्ताधारी पक्षाकडून मित्रपक्षांवर दबाव टाकला जात असल्याचा दावा केला.
पक्षांतर्गत बदल आणि भविष्यातील दिशा
रोहित पवार यांनी पक्षांतर्गत बदलांबाबतही भाष्य केले. त्यांनी सांगितले की, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पक्षाच्या भविष्याबाबत चर्चा झाली. १५ जुलैला नवीन प्रदेशाध्यक्षाची घोषणा होईल. “मी स्वतः प्रदेशाध्यक्ष होण्याच्या मागे नाही. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन नेतृत्वाला संधी द्यावी,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, पक्षात कोणतेही गट नाहीत आणि सर्वजण एकजुटीने शरद पवार यांच्यासोबत विचाराच्या लढाईत सामील असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपच्या रणनीतीवर टीका
पवार यांनी भाजपवर टीका करताना म्हटले की, फडणवीस यांच्यासारखे हुशार नेते उदारमतवादी दृष्टिकोन दाखवत मित्रपक्षांना आकर्षित करतात, पण नंतर त्यांना संपवण्याचे धोरण अवलंबतात. “मराठी विरुद्ध मराठी असा विषय मुंबईत सुरू आहे. पण यामुळे भाजपला यश मिळत नाहीये, म्हणूनच ते मित्रपक्षांना महापौरपदासारखी आश्वासने देत आहेत,” असे ते म्हणाले.
न्यायालयीन लढाई आणि शेतकऱ्यांप्रती बांधिलकी
रोहित पवार यांनी सांगितले की, ईडीने आरोपपत्र दाखल केल्याने आता ही लढाई न्यायालयात लढावी लागेल. “आम्ही कुठेही चूक केलेली नाही. शेतकऱ्यांसाठी आणि कारखाना चालवण्यासाठी आम्ही हा कारखाना घेतला. आता तो स्थिर झाला आहे,” असे त्यांनी नमूद केले. तसेच, २००९-१२ मध्ये कारखाना विक्रीसाठी आला तेव्हा इतर कोणी टेंडर का भरले नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पवार कुटुंबाचे समर्थन
रोहित पवार यांनी सांगितले की, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याशी या प्रकरणावर चर्चा झाली आहे. “पवार साहेबांना सुद्धा याच प्रकरणात ईडीने नोटीस दिली होती. पण आम्ही बिंदास लढणार. महाराष्ट्र आमच्या पाठीशी आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. रोहित पवार यांनी ईडीच्या कारवाईला राजकीय दबावाचा भाग ठरवताना आपण कायदेशीर लढाई लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, शेतकऱ्यांचे हित आणि पक्षाची विचारधारा यासाठी ते लढत राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले. येत्या काळात या प्रकरणात न्यायालयीन निर्णय आणि पक्षांतर्गत बदल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





