Rohit Pawar : रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्ताने 2 हजार जेवणाच्या डब्ब्यांचे वाटप

जामखेड: आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड तालुक्यातील कुसडगावचे माजी सरपंच बापूसाहेब कार्ले यांनी सामाजिक बांधिलकी जपत एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. तालुक्यातील ३१ जिल्हा परिषद शाळा आणि १० अंगणवाड्यांमधील सुमारे २ हजार विद्यार्थ्यांना जेवणाचे डब्बे आणि २० हजार चॉकलेट्स वाटप करण्याचा उपक्रम त्यांनी आयोजित केला आहे. वायफळ खर्चाला फाटा देत राबवण्यात येणाऱ्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जामखेड तालुक्यात यंदा पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आणि सामाजिक बांधिलकीतून समाजाला मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत बापूसाहेब कार्ले यांनी हा उपक्रम राबवण्याचे ठरवले. कुसडगाव, सरदवाडी, भोगलवाडी, डिसलेवाडी, खांडवी, झिक्री, धोंडपारगाव, राजेवाडी, पाडळी, खुरदैठण, सारोळा, काटेवाडी, शिऊर, फाळकेवाडी, बसरवाडी, सावरगाव, मोहा, रेडेवाडी, हपटेवाडी, नाणेवाडी यासह तालुक्यातील विविध गावांतील शाळा आणि अंगणवाड्यांमधील बालवाडी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळणार आहे.
बापूसाहेब कार्ले हे राजकारणासोबतच सामाजिक क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहेत. दरवर्षी ते विविध सामाजिक उपक्रम राबवतात. यामध्ये दिंड्या आणि पालख्यांना महाप्रसाद वाटप, गावातील शाळांना वह्या-पुस्तके वाटप, तसेच गोरगरिबांना धान्य वाटप यांचा समावेश आहे. राहुल उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी १०० ते १५० कामगारांना रोजगार उपलब्ध करून दिला असून, अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह उभा केला आहे. आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ते तालुक्याच्या राजकारणातही सक्रियपणे सहभागी आहेत.
या उपक्रमाच्या माध्यमातून बापूसाहेब कार्ले यांनी सामाजिक बांधिलकी आणि नेतृत्वाचे एक उत्तम उदाहरण घालून दिले आहे. त्यांच्या या कार्यामुळे जामखेड तालुक्यातील विद्यार्थ्यांना आनंदाचा आणि प्रेरणादायी क्षण मिळणार आहे.




