Rohit Patil : एक नंबरच्या बाकावरील वकिलाकडे तुमचे लक्ष असते, तसे या वकिलावर सुद्धा असू द्या ! रोहित पाटलांच पहिलं भाषण गाजलं

Rohit Patil – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित आमदार रोहित पाटील यांनी विधानसभेतील पहिलेच भाषण गाजवले. रोहित पाटलांनी विधानसभेत अवघ्या 6 मिनिटांचे भाषण केले. मात्र संपूर्ण सभागृहाला त्या भाषणाने आर आर पाटलांची आठवण झाली. यावेळी त्यांनी शाब्दिक कोट्या करून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. सर्वांत तरुण आमदार असल्याने सर्वांत तरुण अध्यक्षाने माझ्याकडे विशेष लक्ष द्यावे, अशीही मागणी त्यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करताना रोहित पाटील यांनी संत तुकारामांच्या अभंगाचा उल्लेख केला. रोहित पाटील यांनी भाषणात म्हटले की, संत तुकारामांच्या वाणीतून अभंग आला आहे, अमृताहूनि गोड तुझे नाम देवा. संतांच्या वाणीतून देखील आपलं नाव इतक्या गोड पद्धतीने घेतले आहे.
त्यामुळे पुढच्या काळात काम करत असताना तुम्ही विरोधी पक्षाला देखील गोड पद्धतीच वागणूक द्याल, अशी विनंती आपल्याला करतो. पुराणामध्ये देखील अमृताला वेगळे महत्व होते आणि आजही वेगळे महत्त्व आहे, असे देखील रोहित पाटलांनी म्हटले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील हसू आवरले नाही.
देशाने अनेक शाह्या पाहिल्या आहेत. मात्र लोकशाही अत्यंत महत्त्वाची शाही आपल्या वाट्याला आली. त्यामुळे आपला देश वेगळेपण टीकवू शकला. संसदीय पद्धतीमुळे आपल्या लोकशाहीला वेगळे महत्त्व आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेल्या एकमताच्या अधिकाराने येथे सर्व सन्माननीय सदस्य बसले आहेत.
माझेही वकीलीचं शिक्षण…
अध्यक्ष महोदय आपण जसा सर्वात कमी वयाचे विधानसभा अध्यक्ष म्हणून मान पटकावला आहे, तसाच मी सर्वात कमी वयाचा विधानसभा सदस्य म्हणून मान पटकावला आहे. त्यामुळे तरुण अध्यक्ष म्हणून सर्वात तरुण सदस्याकडे तुमचं बारीक लक्ष असेल, अशी विनंती करतो.
तसेच माझ्यावर लक्ष असावे यासाठी दुसरं कारण म्हणजे तुम्ही निष्णात वकील आहात आणि मी देखील वकीलीचे शिक्षण पूर्ण करत आहे. एक नंबरच्या बाकावरील वकिलाकडे (देवेंद्र फडणवीस) जसे तुमचे लक्ष असते, तसे याही वकिलावर लक्ष असू द्या, अशीही विनंती मी तुमच्याकडे करतो, असे म्हणत रोहित पाटील यांनी वरिष्ठ नेत्यांचे लक्ष वेधले.





