Rohit Gambhir Lords : लॉर्ड्सच्या बालकनीतून वादावर पडदा! रोहित-गंभीरच्या व्हायरल व्हिडिओने चाहत्यांना दिला मोठा दिलासा
Rohit Gambhir Lords : शनिवारी ऐतिहासिक लॉर्ड्सच्या बालकनीतून चाहत्यांना सुखावणारे आणि दिलासा देणारे दृश्य समोर आले आहे.

Rohit Sharma Gautam Gambhir Chat Lords Balcony Video Viral IND vs ENG 3rd ODI : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्टार सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (ODI) क्रिकेटमधील निवृत्तीच्या अफवांना आता पूर्णविराम मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तणावाच्या वातावरणादरम्यान, शनिवारी ऐतिहासिक लॉर्ड्सच्या बालकनीतून चाहत्यांना सुखावणारे आणि दिलासा देणारे दृश्य समोर आले आहे. सोशल मीडियावर भारतीय संघाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून, यामध्ये रोहित शर्मा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि सपोर्ट स्टाफसोबत हसून गप्पा मारताना दिसत आहे.
ड्रेसिंग रुममधील वादावर हसून पडला पडदा!
रोहित शर्माच्या निवृत्तीच्या बातम्यांनंतर संघ व्यवस्थापनात अंतर्गत वाद असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, शनिवारी भारताच्या पर्यायी सराव सत्रादरम्यान रोहित शर्मा मैदानावर उपस्थित होता. सरावाला सुरुवात करण्यापूर्वी रोहितने लॉर्ड्सच्या ऐतिहासिक बालकनीमध्ये संघ व्यवस्थापनासोबत वेळ घालवला. यावेळी कोच गौतम गंभीर आणि रोहित शर्मा यांच्यात खेळकर वातावरणात सकारात्मक चर्चा झाल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. या दृश्यांमुळे संघात सर्व काही आलबेल असल्याचे संकेत मिळत आहेत.
Look at Rohit Sharma and Gautam Gambhir, both having fun together on the Lord’s balcony.😅❤️ pic.twitter.com/MHvHeOy9Ri
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) July 18, 2026
बीसीसीआय सचिवांनी रोहितच्या निवृत्तीचे वृत्त फेटाळले?
दुसऱ्या वनडे दरम्यान आलेल्या अहवालांमध्ये दावा करण्यात आला होता की, निवड समिती रोहितला २०२७ च्या विश्वचषक योजनांमध्ये पाहू इच्छित नाही आणि त्याच्या जागी युवा यशस्वी जैस्वालला संधी दिली जाईल. यावर रोहितने उघड नाराजी व्यक्त केली होती. एका सीनियर खेळाडूला अशा महत्त्वाच्या सामन्यापूर्वी निवृत्तीचा निरोप देणे बीसीसीआयच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवडले नव्हते. शेवटी बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी सर्व पक्षांशी दिवसभर चर्चा करून अधिकृत स्पष्टीकरण दिले आणि रोहितच्या निवृत्तीचे वृत्त फेटाळले.
३०० वनडे सामन्यांचे ध्येय कायम!
कसोटी आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आधीच निवृत्त झालेला रोहित शर्मा सध्या एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात ३०० सामने खेळण्याच्या ऐतिहासिक टप्प्यापासून अवघे १३ सामने दूर आहे. रविवारी १९ जुलै रोजी लॉर्ड्सवर होणारा सामना हा त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना नाही, यावर बीसीसीआयने शिक्कामोर्तब केल्याने आता रोहित नव्या जोशात मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे.





