पुणे : मूत्रपिंड कर्करोगाने ग्रस्त असलेल्या ९२ वर्षीय पुरूषाच्या मूत्रपिंडातील गाठ (ट्युमर) रोबोटिक शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकण्यात एस हाॅस्पिटलचे वरिष्ठ युरोलाॅजिस्ट प्रा. डाॅ. सरेश पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली डाॅक्टरांच्या टीमला यश आले. त्यामध्ये डॉ. गुरुराज पडसलगी, डॉ. मयूर नारखेडे, डॉ. सचिन भुजबळ व सहायक कर्मचारी यांचा समावेश होता. याबाबत हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. सुरेश पाटणकर म्हणाले, “काही महिन्यांपूर्वी ९२ वर्षांचा पुरूष रूग्ण रूग्णालयात आल्यावर त्याला पोटात तीव्र वेदना आणि लघवीतून रक्त येत असल्याची तक्रार होती. त्याची तपासणी केल्यावर मूत्रपिंडाच्या कर्करोगातील गाठीचे (ट्युमर) निदान झाले. यावेळी दुसऱ्या टप्प्यातील कर्करोग असल्याचे निदान झाले. हा ट्युमर रुग्णाच्या उजव्या मूत्रपिंडात होता. रुग्णाचे वय लक्षात घेता रोबोटिक शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला, मात्र तेही आव्हानात्मक होते. अनुभवी डाॅक्टर आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली आणि चौथ्या दिवशी रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे अद्ययावत तंत्रज्ञान व अत्याधुनिक सुविधांसह लवकर निदान आणि वेळेवर उपचार केल्याने कर्करोग बरा होऊ शकतो, असेही डाॅ. पाटणकर यांनी सांगितले.