nagar | करोना काळात हाॅस्पिटलकडून लुट

नगर, (प्रतिनिधी) – करोना महामारीत हॉस्पिटलमध्ये लूट झालेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची बैठक रविवार (दि. २) जून रोजी शहरातील हुतात्मा स्मारकात लोकभज्ञाक चळवळीच्या वतीने बोलविण्यात आली आहे. लूट झालेल्यांचे पैसे त्यांना परत मिळण्यासाठी व आजही काही रुग्णांकडे पैश्यासाठी तगादा लावणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.
करोना काळात अनेक डॉक्टरांनी आपले दवाखाने प्रेत तयार करणारे कारखाने म्हणून चालविले. त्याच वेळेला कोट्यावधी रुपयांचा मलिदा खाल्ला. त्यामुळे डॉक्टरांबाबत समाजामध्ये मोठी नाराजी पसरली आहे. कोविशील्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसीमुळे दुर्गामी दुष्परिणाम होत असल्याबाबत बोलले जाते त्यातून पुन्हा डॉक्टर लोक जनतेची लूट केल्याशिवाय राहणार नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
२ जून रोजी दुपारी ३ वाजता हुतात्मा स्मारकात बैठक होणार असून, या बैठकीस करोना काळात हॉस्पिटलकडून लूट झालेल्या नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी ॲड. गवळी, शाहीर कान्हू सुंबे, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, डॉ. रमाकांत मडकर, जालिंदर बोरुडे, ओम कदम आदी प्रयत्नशील आहेत.





