श्रीरामपूर आरटीओ कार्यालयात झेब्रा रेडियमवाल्यांकडून लुट; वाहनधारक त्रस्त

नेवासा : श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात पासिंगसाठी येणाऱ्या वाहन चालक – मालकांना रेडियम सुस्थितीत असले तरी दमदाटी करून नवीन झेब्रा रेडियम लावण्याची सक्ती केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. जबरदस्तीने हे रेडियम लाऊन अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल केली जात असल्याच्या तक्रारी वाहन चालक-मालकांकडून केल्या जात आहे.
मनमानी पैसे न दिल्यास एकट्या चालक – मालकाला १५ ते २० लोकांकडून उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांसमोरच अमानुष मारहाण केल्याची घटना घडलेली असताना या प्रकाराकडे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करुन “तुम्ही पोलिस स्टेशनला जा”, असे सांगून अप्रत्यक्षपणे झेब्रा रेडियमवाल्यांना क्लिनचिट दिल्याचा आरोपही वाहनधारकांकडून केला जात आहे.
राज्याच्या परिवहन आयुक्तांनी स्पष्ट शब्दात म्हटले आहे की, वाहनांचे रेडियम चांगले सुस्थितीत असेल तर नवीन रेडियम लावण्याची वाहनधारकांना सक्ती करू नये, तसेच गैरप्रकार टाळण्यासाठी जनमाहितीसाठी पॉसिंग गाऊंड ट्रॅक व कार्यालय आवारात रेडियमचे अधिकृत डिलर आणि त्यांचे नांव, तसेच रेडियमचे शासकीय दर यांचे बोर्ड (फलक) लाऊन त्याचे छायाचिञ २५ जून २०२१ पर्यंत परिवहन आयुक्त कार्यालयाकडे पाठवावे, असे स्पष्ट आदेश दिलेले आहेत. याबाबत आरटीओ अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, त्याबाबत आम्हाला माहितीच नाही? असे उत्तर वाहनधारकांना दिले जात आहे.
याबाबत संघटनेकडे तक्रार प्राप्त झाल्यावर कोपरगांव, संगमनेर, श्रीरामपूर येथील काही चालक – मालक संघटना आणि पदाधिकारी यांनी शुक्रवार (दि.७) रोजी श्रीरामपूर आरटीओ कार्यालयाला एक निवेदन दिलेले आहे. यामध्ये म्हटले आहे की, या कार्यालयासमोर सुरु असलेल्या गैरप्रकाराचे छायाचिञ संघटनेकडे आहेत.
याबाबत आपण पालकमंत्री, परिवहनमंत्री, मुख्यमंत्री आणि जिल्हा पोलीस अधिक्षकांना तसेच राज्यातील वरिष्ठ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहे. तसेच झेब्रा रडियमवाल्यांकडून अधिकृत भावफलक न लावल्यास येत्या आठ दिवसात आपल्या कार्यालयासमोर अमरण उपोषण करणार असल्याचा इशारा कोपरगाव ट्रक चालक मालक, ट्रान्सपोर्ट अशोशियन संगमनेर तसेच श्रीरामपूर जयहिंद चालक – मालक संघटनेतर्फे देण्यात आला आहे .


