पिंपरी | दापोडी परिसरातील रस्ते झाले खड्डेमय

पिंपळे गुरव, (वार्ताहर) – मुसळधार पावसामुळे दापोडी येथील गणेश अंगण सोसायटी, विनियार्ड चर्च येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
तर नदीला मिळणारा नाला फुटला असल्याने पाणी बुद्ध विहारासमोर पाणी जमा होत आहे. येथून वाहनांची वर्दळ असल्यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.
याची महापालिकेच्या स्थापत्य व आरोग्य विभागाने तातडीने दखल घेऊन रस्त्यावरील खड्डे बुजवावे, तसेच रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याबाबत योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक करत आहेत.
दरम्यान दापोडी परिसरातील अनेक रहदारीच्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून रस्त्यांवर पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्डे दिसत नाहीत. त्यामुळे स्थानिक नागरिक व प्रवाशांना जीव मुठीत घेऊन येथून जावे लागते.
रस्त्यांवरील खड्डे आणि वाढती वाहतूककोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी आग्रहाची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.




