Nane-Kamshet: रस्त्याचे रुंदीवरून वादाच्या भोवऱ्यात; मूळ २० फूट रुंदीऐवजी १८ फुटांचा रस्ता होत असल्याचा आरोप
साईडपट्ट्याही अरुंद, ग्रामस्थ आक्रमक

नाणे मावळ – नाणे-कामशेत रस्त्याचे सुरू असलेले काम सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. रस्त्याची मूळ रुंदी कमी करून काम केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पूर्वी २० फूट रुंदीचा असलेला रस्ता सध्या १८ फुटांचा केला जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, प्रशासनाने प्रत्यक्ष मोजणी करून रस्त्याची मूळ रुंदी कायम ठेवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
नाणे-कामशेत हा परिसरातील नागरिकांच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग आहे. या रस्त्यावरून स्थानिक नागरिक, दुचाकीस्वार, चारचाकी वाहने तसेच मोठ्या वाहनांची नियमित ये-जा सुरू असते. त्यामुळे रस्त्याची रुंदी आणि त्याच्या दोन्ही बाजूंची सुरक्षित जागा महत्त्वाची ठरते.
अशा परिस्थितीत सुरू असलेल्या कामात रस्त्याची रुंदी कमी होत असल्याचा आरोप पुढे आल्याने ग्रामस्थांनी या कामाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी नाणे-कामशेत रस्त्याची रुंदी २० फूट होती. याशिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी दोन फूट साईडपट्टी उपलब्ध होती. त्यामुळे समोरासमोरून वाहने आल्यास एकमेकांना बाजू देण्यासाठी पुरेशी जागा मिळत होती.
मात्र, सध्या सुरू असलेल्या कामात रस्त्याची रुंदी १८ फूट ठेवली जात असल्याचा आक्षेप ग्रामस्थांनी घेतला आहे. तसेच दोन्ही बाजूंच्या साईडपट्ट्यांची रुंदीही प्रत्येकी एक फूट ठेवली जात असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.
मोठ्या वाहनांना रस्त्यावरून मार्गक्रमण करताना अधिक जागेची आवश्यकता असते. समोरून दुचाकी किंवा चारचाकी वाहन आल्यास दोन्ही वाहनांना सुरक्षितपणे बाजू देण्यासाठी रस्त्याची पुरेशी रुंदी असणे गरजेचे आहे.
रस्त्याच्या कडेला असलेली साईडपट्टीही यासाठी महत्त्वाची ठरते. मात्र साईडपट्ट्यांची रुंदी कमी झाल्यास वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
अपघात झाल्यानंतर जबाबदारी कोणाची?
रस्त्याच्या कामात सुरुवातीपासूनच सुरक्षिततेच्या बाबींचा विचार केला पाहिजे. वाहनचालकांना अडचणी येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केले गेले, तर भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आज एखादे मोठे वाहन रस्त्याच्या कडेला घसरले आहे. उद्या याच ठिकाणी गंभीर अपघात घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
प्रत्यक्ष मोजणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी
रस्त्याच्या रुंदीबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी संबंधित विभागाने प्रत्यक्ष मोजणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पूर्वी रस्त्याची रुंदी किती होती, सध्या किती रुंदीचे काम केले जात आहे आणि मंजूर आराखड्यात किती रुंदी निश्चित करण्यात आली आहे, याची स्पष्ट माहिती नागरिकांसमोर मांडावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
सार्वजनिक निधीतून होणाऱ्या रस्त्याच्या कामात पारदर्शकता असणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करावी.
ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोजणी करून रस्त्याच्या रुंदीबाबत निर्माण झालेला वाद मिटवावा. कामामध्ये काही त्रुटी आढळल्यास त्या तातडीने दुरुस्त कराव्यात, अशी मागणीही होत आहे.
‘प्रशासनाने नाणे-कामशेत रस्त्याच्या कामाची तातडीने दखल घेऊन रस्त्याची योग्य मोजणी करावी आणि आवश्यक दुरुस्ती करावी. नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड होता कामा नये. प्रशासनाने लवकरात लवकर कार्यवाही न केल्यास दिवाळीनंतर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.’ – सचिन नाणेकर, सामाजिक कार्यकर्ते
‘हा रस्ता नागरिकांच्या सोयीसाठी दुरूस्त करण्यात आला होता, परंतु त्याची रुंदी कमी करण्यात आल्यामुळे दोन-तीन गाड्या रस्त्याच्या कडेला खाली उतरल्या होत्या. त्या वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्यातच रस्त्याच्या बाजूला डाकलेला मुरम वारंवार खचतो, त्यामुळे हा त्रास सहन करावा लागत आहे.’ – रघुनाथ आंद्रे, सामाजिक कार्यकर्ते.





