वाघोली पोलीस ठाण्याचा मार्ग मोकळा; वाघोलीकरांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मानले आभार

वाघोली – पुणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत वाघोली नवीन पोलीस ठाण्याचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच पोलीस ठाणे सुरू होणार असल्याने वाघोली मधील ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे.
वाघोलीत वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून गुन्हेगारी व कायदा- सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने वाघोली नवीन पोलीस स्टेशन कार्यरत करण्यासाठी 4 ऑगस्ट 2023 रोजी मंत्रालय मुंबई येथे भाजपचे जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष संदीप सातव यांनी भेटून निवेदन दिले होते. निवेदनात पायाभूत सुविधा, त्यासाठी अपेक्षित खर्चाची तरतूद आणि पोलिस ठाण्यांची रचना, हद्द, मनुष्यबळ, वाहने तरतूद करून निधी उपलब्ध करण्याची मागणी गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे करण्यात आली होती. त्यावेळी लवकर स्वतंत्र वाघोली पोलीस स्टेशन होईल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी सातव यांना दिले होते.
त्यानंतर लगेच राज्य शासनाकडून पोलीस महासंचालक यांच्या कार्यालयाकडून प्रस्ताव मागवण्यात आला.1 नोव्हेंबर 2023 पुणे पोलीस आयुक्त यांनी वाघोली स्वतंत्र पोलीस स्टेशन करण्याबाबत राज्य शासनाला प्रस्ताव पाठवला होता. राज्य शासनाने अंतिम प्रशासकीय मान्यता देऊन वाघोली पोलीस स्टेशनसाठी 8 कोटी 75 लाख रुपये निधी मंजूर केला असून लवकरच वाघोली स्वतंत्र पोलीस स्टेशन कार्यरत होणार आहे. त्याबद्दल वाघोली नागरिकांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे ग्रामस्थांनी मनापासून आभार मानले आहेत.
“वाघोली करांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार राहुल कुल, आमदार महेश लांडगे, प्रदीप कंद आदींनी याबाबत मोलाची मदत व सहकार्य केले आहे.”
– संदिप सातव (जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, सदस्य, पुणे महानगरपालिका शा. नि.समिती)




