पुणे : यंदाही पावसाळ्यात ‘वाट’ बिकट

पुणे- महापालिकेकडून गेल्या काही वर्षांपासून शहरातील रस्त्यांचे सर्वेक्षण करून पावसाळ्यात उखडू शकणारे रस्ते पावसाळ्यापूर्वी दुरूस्त केले जातात. त्यासाठी दरवर्षी आयुक्तांच्या अंदाजपत्रकात 45 ते 50 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली जाते. मात्र, यंदा ही रस्ते दुरुस्ती होणार नसल्याचे समोर आले आहे. हा निधी महापालिका प्रशासनाकडून शहरातील खोदाई झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी वापरण्यात आला आहे. विशेष म्हणजे खोदाई केलेले रस्ते दुरुस्त करण्याची जबाबदारी खोदाईचे काम करणाऱ्या ठेकेदारांकडे असते. मात्र, त्यांच्याकडून करण्यात आलेल्या दुरुस्तीमुळे रस्ते असमतोल झाल्याने पुन्हा रिसर्फेसिंगचा निधी वापरत रस्ते दुरुस्त करण्यात आले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यांची वाट बिकट असणार असल्याची चिन्हे आहेत. दरवर्षी सुमारे 20 ते 25 रस्त्याचे रिसर्फेसिंग महापालिका करते.
शहरात गेल्या काही वर्षांपासून महापालिकेच्या समान पाणी योजनेच्या जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासोबतच पालिकेकडून शहराच्या मध्यवर्ती भागासह काही उपनगरांमध्ये मोठ्या आकाराच्या सांडपाणी वाहिन्या टाकलेल्या आहेत. हे काम झाल्यानंतर संबंधित काम करणाऱ्या ड्रेनेज तसेच पाणी पुरवठ्याच्या ठेकेदाराने पुन्हा खोदलेला रस्ता दुरुस्त करणे अपेक्षित आहे. मात्र, हे काम डांबरी रस्ता खोदून करण्यात आले आहे, तर संबंधित ठेकेदारांनी खोदलेला रस्ता दुरुस्त करताना कॉंक्रिटीकरण केलेले आहे. परिणामी, रस्ता खालीवर झाल्याचे शहरात अनेक भागांत दिसून आले. त्यामुळे, महापालिका जलवाहिन्या टाकलेल्या ठेकेदारांना कॉंक्रिटीकरणाच्या कामाचे पैसे देणार आहे. मात्र, त्यानंतर रस्ता असमतोल झाल्याने पालिकेने पूर्णच्या पूर्ण रस्तेच पुन्हा डांबरीकरण केले आहेत. या कामांसाठी पथ विभागाकडे निधी नव्हता त्यामुळे पथ विभागाने महापालिका आयुक्तांची मान्यता घेत रस्ते रिसर्फेसिंगचा निधी खोदलेल्या रस्त्यांसाठी वापरला गेला आहे. परिणामी अनेक रस्ते पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करण्यासाठी पालिकेकडे निधीच नाही.
कशासाठी केले जाते रिसर्फेसिंग
शहरातील अनेक रस्ते वर्दळीमुळे खराब होतात. महापालिका अशा रस्त्याचे पावसाळ्यापूर्वी सर्वेक्षण करते. त्यात, प्रामुख्याने हे रस्ते पावसाळ्यात उखडले जातील का, रस्त्याचा कोणता भाग, किती अंतराचा रस्ता खराब होऊ शकतो, किती भागात खड्डे पडू शकतात याचे सर्वेक्षण केले जाते. त्यानंतर 31 मार्चपूर्वी अशा रस्त्यांची यादी तयार करून त्याच्या कामासाठी निविदा काढल्या जातात. त्यानुसार, एप्रिल आणि मे महिन्यात हे खराब होणारे रस्ते पूर्णत: अथवा त्याचा खराब होऊ शकणारा भाग दुरूस्त केला जातो. त्यामुळे पावसाळ्यात हे रस्ते सुस्थितीत राहण्यास मदत होते, असे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.





