Road Pothole Protest : सासवड ते सोनोरी रस्त्यावरून गावकरी आक्रमक! खड्ड्यांमध्ये झाडं लावून ग्रामस्थांचा प्रशासनाला सज्जड इशारा

प्रभात वृत्तसेवा
वाघापूर – सासवड ते सोनोरी रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डयांचा आकार वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर सोनोरी ग्रामस्थांनी खड्डयांमध्ये वृक्षारोपण करून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.खड्डयांबाबत ठोस निर्णय घेतला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असाही इशारा ग्रामस्थांनी दिला.यंदाच्या पावसाळ्यात सासवड ते सोनोरी रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. पाच किलोमीटरच्या मार्गावरील खड्डयांमुळे वाहन चालकांना मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या संदर्भात प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या.
मात्र, प्रशासन तात्पुरती डागडुजी करते. पुन्हा पावसात खड्यांचा आकार वाढत जातो. त्यामुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. याचा निषेध नोंदविण्यासाठी सोनोरी ग्रामस्थांनी अनोखे आंदोलन केले.सोनोरी गावात रोडवर पडलेला खड्डयांमध्ये वृक्षारोपण करीत प्रशासनाचा निषेध नोंदविला. यावेळी माजी सरपंच बाळासाहेब काळे, भारत मोरे, सतीश शिंदे, लक्ष्मण पवार, दीपक झेंडे, सुनील शिंदे, परसराम आढाळगे, रमेश काळे, तेजस कामठे, अर्जुन काळे, विलास काळे, किसन काळे, अर्जुन काळे, नंदकुमार शिंदे, ग्रामस्थ उपस्थित होते.
“रस्ते पावसात खराब झाल्याने दरवर्षी पॅचवर्क व रस्ते दुरूस्तीवर प्रशासन मोठा खर्च करते. परंतु ही कामे दर्जेदार होत नाही. सासवड ते सोनोरी रस्त्याच्या कामाबाबत प्रशासनासी वारंवार पाठपुरावा करून देखील काम होत नाही.”
-भारत मोरे, माजी सरपंच, सोनोरी.


