रस्त्यावर बांधकाम साहित्य; नागरिक त्रस्त

नगर – शहरात सध्या प्रत्येक परिसरात व गल्लीबोळात बांधकाम करण्यात येत आहे. त्यामुळे बांधकाम धारक हे रस्त्यांमध्ये बांधकाम साहित्य टाकत आहे. या प्रकारामुळे वाहनधारक व नागरिकांना प्रचंड मनस्ताप होत असून नागरिक वैतागले आहेत.
रस्त्यावर टाकण्यात आलेल्या बांधकाम साहित्यामुळे नियमित अपघातांच्या घटना घडू लागल्या आहेत. मात्र या गंभीर प्रकाराकडे महापालिकेच्या संबंधित यंत्रणेचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत असून नगरसेवकांचीही दुर्लक्षपणा याला कारणीभूत ठरल्याचा आरोप होत आहे. या गंभीर बाबीची महापालिका प्रशासनाने दखल घेणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
शहरातील काही भागात रस्त्यावर बांधकामाचे साहित्य ठेवण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम वाहतुकीवर होत असून वाहतुकीची कोंडी होत आहे. काही ठिकाणी तर काही महाभागांनी पूर्ण रस्त्यावरच बांधकामांचे साहित्य टाकणे सुरू केले. अनेक ठिकाणी बांधकाम होत असल्याने भर रस्त्यामध्ये गिट्टी, मुरूम, लोखंड, विटा, रेती टाकण्यात येत असल्याचे चित्र आहे. याचा नागरिकांना त्रास होत आहे.
मात्र महानगरपालिका बांधकाम धारकांवर कारवाई करत नसल्याचे दिसून येते. दिवसेंदिवस भर रस्त्यांमध्ये बांधकाम साहित्य टाकण्याचे प्रकार वाढत आहेत. रस्त्यावर बांधकाम साहित्य विखुरल्याने अनेकदा वाहने कोसळुन अपघात घडत आहेत. मात्र या समस्येकडे महापालिकेने दुर्लक्ष आहे. धोकादायक पद्धतीने रस्त्यावर वाळू टाकणाऱ्यांकडून दंड वसूल करण्याऐवजी त्याकडे कानाडोळा करण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी बांधकाम साहित्याचा अंदाज न आल्यास अपघात होण्याचाही धोका आहे. मात्र, मनपा प्रशासन या संदर्भात कुठलीही कार्यवाही करत नसल्यामुळे या प्रकाराला महानगरपालिकेची मूकसंमती असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.





