Road accident : कोंढापुरीत दुर्दैवी अपघात! कंटेनरच्या धडकेत 22 वर्षीय युवतीचा मृत्यू

प्रभात वृत्तसेवा
शिक्रापूर – कोंढापुरी (ता. शिरुर) येथे कंटेनरच्या धडकेत युवतीचा मृत्यू झाला. गायत्री गजानन इंगळे (वय २२, रा. इकोग्राम सोसायटी शिक्रापूर, ता. शिरुर), असे मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. पुणे- नगर महामार्गावरून गायत्री इंगळे ही दुचाकी घेऊन कासारी फाटा येथे कुरिअर आणण्यासाठी जात असताना रस्ता ओलांडण्यासाठी दुभाजकाजवळ थांबलेली असताना अहिल्यानगरच्या दिशेने आलेल्या कंटेनरची गायत्रीच्या दुचाकीला धडक बसली. यात गायत्री गंभीर जखमी झाली.
तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे घोषित केले. याबाबत गौतम श्रीराम इंगळे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. पोलिसांनी कंटेनर चालक राजन कुमार गौतम (रा. दिलीपनगर, उत्तरप्रदेश) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हवालदार कृष्णा व्यवहारे हे करीत आहेत.




