RMC Plant – शहरामध्ये प्रदूषणाची समस्या तीव्र होत असताना आरएमसी (रेडी मिक्स काँक्रीट) प्लांटमुळे ही समस्या आणखी तीव्र झाली आहे. शहरातील अनेक प्लांटचालक नियमांकडे दुर्लक्ष करून प्लांट सुरू ठेवत आहेत. असाच एक प्रकार तळवडे येथील आरएमसी प्लांटबाबत समोर आला आहे. या प्लांटमध्ये रात्रीच्या वेळी काम सुरू असते. तसेच परिसरात धूळ, आवाज आणि प्रदूषण वाढत असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत आहे. मात्र, महापालिकेच्या पर्यावरण विभागासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने देखील याकडे दुर्लक्ष केले आहे. तळवडे परिसरातील आरएमसी प्लांट चालक रात्री उशिरापर्यंत काँक्रीट तयार करण्याचे काम सुरू ठेवतात. या प्रक्रियेदरम्यान मोठ्या यंत्रसामग्रीचा वापर होत असल्याने मोठा आवाज निर्माण होतो. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या कामामुळे परिसरातील नागरिकांची झोपमोड होत असून वृद्ध, लहान मुले आणि आजारी व्यक्तींना त्याचा विशेष त्रास सहन करावा लागत आहे. आरएमसी प्लांटमधून मोठ्या प्रमाणात सिमेंट व वाळू हाताळली जात असल्याने धूळ उडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे धूळ नियंत्रणासाठी नियमित पाण्याची फवारणी करणे, साठवण साहित्य झाकून ठेवणे, प्लांट परिसरात हरितपट्टा तयार करणे तसेच प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करणे बंधनकारक असते. मात्र, स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या नियमांचे योग्य पालन केले जात नाही. त्यामुळे दिवस आणि रात्री दोन्ही वेळेस परिसरात धुळीचे प्रमाण वाढले असून नागरिकांच्या श्वसनाच्या तक्रारी वाढल्या आहेत.परिसरातील नागरिकांनी या संदर्भात अनेकदा संबंधित प्रशासनाकडे तक्रारी केल्याचा दावा केला आहे. मात्र, अद्यापही या समस्येवर ठोस तोडगा निघाला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात ट्रक आणि मिक्सर गाड्यांची ये-जा सुरू असल्याने वाहतुकीचा त्रासही वाढत आहे. तसेच हे वाहनचालक नियमांचे पालन करत नसल्याने वाहतूककोंडी होते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पिंपरी चिंचवड महापालिका तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी तातडीने या आरएमसी प्लांटची तपासणी करावी, नियमांचे उल्लंघन होत असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे. कारवाईच्या नावाने शिमगा महापालिकेच्या पर्यावरण विभागाने काही दिवसांपूर्वी आरएमसी प्लांटचालकांनी प्रदूषण नियंत्रण उपाययोजना करण्याचे आदेश दिले. प्लांटमधून धूळ उडू नये यासाठी सातत्याने पाण्याचा फवारा करावा. वायू प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना केल्या नाही तर अशा आस्थापनांवर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. शहरातील एकही आरएमसी प्लांटचालक नियमांचे पालन करत नसल्याचे वारंवार समोर येत आहे. तरीही आरएमसी प्लांटचालकावर कारवाई करण्याची हिमत महापालिका प्रशासनाने दाखवत नाही.