RMC Plant Demolition : आरएमसी प्रकल्पावर महापालिकेचा बुलडोझर! ८ अनधिकृत प्रकल्प जमीनदोस्त..पाहा काय घडलं?
RMC Plant Demolition : आरएमसी प्लांटवरील कारवाईमुळे बांधकाम क्षेत्रात खळबळ; ४० हजार मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न, बांधकाम व्यावसायिकांकडून भीती व्यक्त.

RMC Plant Demolition : महापालिकेने अखेर शहरातील अनधिकृत रेडी मिक्स काॅक्रिट प्रकल्पावर कारवाई सुरू केली आहे. बुधवारी पहाटे लोहगाव-खांदवे नगर तसेच खराडी परिसरातील ८ आरएमसी प्लॅन्ट व अन्य बांधकामे जमीनदोस्त केली. या कारवाईत एकूण ५२ हजार २५० चौरस फूट अनधिकृत कच्चे- पक्के शेड आणि बांधकामे हटविण्यात आली. पहाटे दोन वाजता ही कारवाई करण्यात आली.
मात्र, या कारवाईवेळी स्थानिक नगरसेविकेचे पती आणि महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाला, त्यानंतर नगरसेविकेच्या पतीस पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तसेच कारवाईनंतर सोडून देण्यात आले. शहरात गेल्या महिन्यापासून आरएमसी प्रकल्पामुळे होणाऱ्या धुळीच्या प्रदूषणाच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्या आहेत. खांदवे नगर येथील प्रकल्पाबाबत तक्रारी आल्याने महापालिकेने या प्रकल्पांना सील ठोकत ते बंद केले होते.
त्यानंतर बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पथक मोठ्या पोलीस बंदोबस्तात दाखल झाले. त्यांनी कारवाई सुरू केली. यावेळी नगरसेविका डाॅ. श्रेयस खांदवे यांचे पती प्रीतम खांदवे यांनी घटानास्थळी जाऊन कारवाई थांबविण्याचा प्रयत्न केला. तसेच, महापालिकेने कारवाईपूर्वी कोणतीही नोटीस दिलेली नाही. प्रकल्प आधीच बंद आहे, अशा सांगत कारवाई करण्यास विरोध केला.
यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांचा वाद झाला. त्यानंतर, हा वाद वाढत असल्याने कारवाईसाठी गेलेल्या महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना ताब्यात घेऊन पिंजऱ्यामध्ये बसवले आणि पोलिस ठाण्यात घेऊन गेले. त्यानंतर महापालिकेने उरलेली कारवाई पूर्ण केली.
हजारो कामगार बेघर होणार
आरएमसी हा बांधकामाचा मुख्य गाभा आहे, पायाभरणी, स्लॅब आदी बहुतांश बांधकाम त्यानेच होते. ते जर मिळाले नाही तर हे काम होणार नाही. हे काम करणारे जे विशेष मजूर असतात त्यांना बसून ठेवावे लागेल, ते काम पूर्ण झाले नाही तर पुढची प्लॅस्टरींग वगैरे कामे होणार नाहीत. ही एकमेकांवर अवलंबून असलेले कामे आहेत. त्यामुळे या सगळ्या कामगारांना हाताला काम न देता सांभाळणे अवघड जाणार आहे.
शहरात किमान एक हजार मध्यम आणि छोटे बांधकाम व्यावसायिक आहेत. या सगळ्यांकडे मिळून किमान एक लाख कामगार काम करतात. त्यातील प्राथमिक स्तरावर किमान ४० हजार मजूर आणि कामगारांचे काम जाण्याची शक्यता आहे. हे कामगार कामाच्या शोधार्थ अन्य राज्यात किंवा शहरात जाण्याची शक्यता असून, परिस्थिती पूर्ववत झाल्यावर त्यांना आणणे मुश्किल होणार आहे, अशी भिती बांधकाम व्यावसायिक व्यक्त केली.
“कारवाईवेळी प्रीतम खांदवे यांनी वाद घातला, त्यावरून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वादामुळे कारवाईत अडथळे निर्माण झाल्याने सुरक्षा रक्षकांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात घेऊन गेले. महापालिकेने हा प्लॅन्ट पाडून टाकला आहे.”
– सोमनाथ बनकर, उपायुक्त, अतिक्रमण निर्मूलन विभाग





