RMC Plant – पुणे शहरातील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी खाजगी तसेच महापालिकेचे आरएमसी (रेडी मिक्स काँक्रीट) आणि डांबर (हॉटमिक्स) प्लांट शहराबाहेर हलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहराच्या हद्दीवरील चारही कोपर्यांमध्ये हे प्लांट विभागण्याचे नियोजन असून, त्यासाठी जागांचा शोध सुरू आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, शिंदेवाडी जकातनाका तसेच वाघोली परिसरातील जागांवर नव्याने डांबर प्लांट उभारण्यासाठी पुढील सहा महिन्यांत कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. नगरसेवक हरिदास चरवड यांनी वडगाव परिसरातील आरएमसी प्लांटमुळे होत असलेल्या प्रदूषणाचा मुद्दा स्थायी समितीत मांडला होता. दाट लोकवस्तीच्या भागात सुरू असलेल्या या प्लांट्समुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी आणि ते अन्यत्र हलवावेत, अशी मागणी त्यांनी केली होती. या संदर्भात झालेल्या चर्चेनंतर स्थायी समितीने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे उल्लंघन करणार्या आरएमसी व डांबर प्लांट्सवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. तसेच भविष्यात शहराच्या हद्दीबाहेरील कमी लोकसंख्या असलेल्या भागात हे प्रकल्प स्थलांतरित करण्यासाठी खाजगी व्यावसायिकांनाही आवाहन करण्यात येणार आहे. दरम्यान, महापालिकेचा येरवडा येथील डांबर प्लांटही लवकरच शहराबाहेर हलविण्यात येणार असून, शहराच्या चारही कोपर्यांमध्ये असे प्रकल्प विभागण्याची योजना आहे.