Riyaz Ganji : प्रसिद्ध लिबास ब्रँडचे फॅशन डिझायनर रियाझ गांजी (Riyaz Ganji) यांच्याविरुद्ध मालमत्तेची माहिती उघड न केल्याचा आणि देणी थकवल्याचा आरोप करणाऱ्या एका अवमान याचिकेच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. गांजी (Riyaz Ganji) यांच्या वर्तनामुळे ते कोणत्याही सहानुभूतीस किंवा दयेस पात्र नाहीत, असे न्यायालयाने या वेळी नमूद केले. न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या एकल पीठाने दिलेल्या आदेशात गांजी यांना न्यायालयात उपस्थित राहण्याचे निर्देश देऊनही ते गैरहजर राहिल्याची गंभीर दखल घेतली. तसेच, सुनावणीच्या पुढील तारखेला म्हणजेच २७ एप्रिल रोजी गांजी यांची उपस्थिती सुनिश्चित करण्याचे निर्देश पोलिसांना दिले. फॅशन डिझायनरचे हे वर्तन न्यायिक प्रक्रियेचा अनादर करणारे असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. Mumbai High Court जीएस मॅजेस्टिक डेव्हलपर्स प्रा. लि. या कंपनीने लिबास डिझाइन्स प्रा. लि. आणि इतरांविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर हे पीठ सुनावणी करत होते. गांजी (Riyaz Ganji) हे लिबास डिझाइन्सचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. हा वाद पंजाबमधील लुधियाना येथील जीएसएमच्या (GSM) ग्रँड वॉक मॉलमध्ये असलेल्या लिबासच्या फ्रँचायझी स्टोअरशी संबंधित आहे, जिथून लिबासने करारातील देणी न चुकवता जागा रिकामी केली होती.