Ameesha Patel: अमीषा पटेल अडचणीत; मुरादाबाद न्यायालयाकडून गैरजामिनपात्र वॉरंट जारी
मिळालेल्या माहितीनुसार, २०१७ मध्ये एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने अमीषा (Ameesha Patel ) यांना लग्नात नृत्य सादर करण्यासाठी बोलावले होते. कंपनीचे मालक पवन कुमार वर्मा यांनी त्यांना १४ लाख ५० हजार रुपये देण्याचे मान्य केले होते. त्यापैकी ११ लाख रुपये अॅडव्हान्स म्हणून देण्यात आल्याचा आरोप आहे.

Ameesha Patel: बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल यांच्या अडचणी वाढल्या आहेत. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील न्यायालयाने त्यांच्या विरोधात गैरजामिनपात्र वॉरंट (Non-Bailable Warrant) जारी केले आहे. हा संपूर्ण प्रकार २०१७ सालातील एका लग्न समारंभातील परफॉर्मन्सशी संबंधित आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २०१७ मध्ये एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने अमीषा (Ameesha Patel ) यांना लग्नात नृत्य सादर करण्यासाठी बोलावले होते. कंपनीचे मालक पवन कुमार वर्मा यांनी त्यांना १४ लाख ५० हजार रुपये देण्याचे मान्य केले होते. त्यापैकी ११ लाख रुपये अॅडव्हान्स म्हणून देण्यात आल्याचा आरोप आहे.
मात्र, लग्नाच्या दिवशी अमीषा दिल्ली येथे पोहोचल्या, पण कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांनी आणखी २ लाख रुपयांची मागणी केल्याचे सांगितले जाते. आयोजकांनी ही रक्कम देण्यास नकार दिल्यानंतर अमीषा कार्यक्रम न करता परत गेल्याचा आरोप आहे. तसेच, घेतलेले ११ लाख रुपये परत न दिल्याची तक्रार करण्यात आली आहे.
या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम 120B, 406, 420, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल आहे. याशिवाय २ लाख रुपयांचा चेक दिला होता, तोही बाऊन्स झाल्याचे समोर आले आहे.
न्यायालयाने २०२६ मध्ये हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, अमीषा न्यायालयात उपस्थित न राहिल्याने कोर्टाने कठोर भूमिका घेत गैरजामिनपात्र वॉरंट जारी केले.
यापूर्वीही अमीषा पटेल (Ameesha Patel) एका आर्थिक वादात अडकल्या होत्या. एका निर्मात्याने त्यांच्या ‘देसी मॅजिक’ चित्रपटासाठी मोठी गुंतवणूक केली होती. चित्रपट पूर्ण न झाल्याने वाद निर्माण झाला; मात्र २०२४ मध्ये रक्कम परत केल्यानंतर तो विषय निकाली निघाला.
सध्या या नव्या प्रकरणामुळे अमीषा पटेल यांच्या अडचणी वाढल्या असून, त्या न्यायालयात हजर होऊन हा वाद कसा सोडवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






