River Pollution : शहरातील नद्यांचे पाणी विषारी? केंद्रीय पथकाने घेतले पाण्याचे नमुने,आता अहवालाकडे लक्ष
River Pollution : पर्यावरणप्रेमींच्या तक्रारींना यश, केंद्रीय पथकाकडून पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीची प्रत्यक्ष पाहणी; प्रदूषणाची नेमकी पातळी लवकरच होणार स्पष्ट.

River Pollution – पिंपरी-चिंचवड शहरातील पवना, इंद्रायणी आणि मुळा या तिन्ही नद्यांचे प्रदूषण वाढल्याच्या तक्रारी शहरातील पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केल्या आहेत. त्यामुळे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पथकाने तिन्ही नद्याच्या पाण्याचे तपासणीसाठी नमुने घेतले आहेत.
नद्यांच्या पाण्याची गुणवत्ता तपासून त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या पथकाकडून अहवाल दिला जाणार आहे.शहराच्या हद्दीतून पवना नदीची लांबी २४.४, इंद्रायणी नदीची लांबी २०.६ आणि मुळा नदीची लांबी १२.४ किलोमीटर आहे. शहरातील नदी प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.
शहरातील नाल्यांद्वारे मैलापाणी, तसेच कारखान्यांचे रसायनयुक्त सांडपाणीही थेट नदीत मिसळते. शहरीकरणामुळे पवना, इंद्रायणी व मुळा नदीचे प्रदूषण वाढले आहे. शहरातून वाहणारी पवना नदी देशातील सर्वाधिक प्रदूषित नदी असल्याचा निष्कर्ष प्रदूषण मंडळाने गतवर्षी दिला होता.
महापालिका आणि राज्य प्रदूषण मंडळाने यापुर्वी पवना नदीवर २५ ठिकाणी, इंद्रायणी नदीवर १२ ठिकाणी, मुळा नदीवर १० ठिकाणी उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीनही ऋतूंत पाण्याचे नमुने घेवून प्रदूषणाच्या नोंदी घेतल्या. त्यात शहरातील नद्यांचे आरोग्य बिघडले असल्याची माहिती समोर आली आहे.
पवना नदी किवळेपासून ते दापोडीपर्यंत, इंद्रायणी नदी तळवडेपासून, तर आळंदीपर्यंत आणि मुळा नदी वाकडपासून दापोडीपर्यंत प्रदूषित होत असल्याचे आढळून आले आहे. दरम्यान, शहरातील पर्यावरण प्रेमी नागरिकांकडून नद्याचे प्रदूषणावर उपाययोजना करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. अनेक पर्यावरणप्रेमी नागरिकांनी प्रदूषणाबाबत तक्रारी केलेल्या आहेत.
त्यानुसार नद्याचे प्रदूषण आणि पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून बुधवारी (दि.२९) शहरातील पवना, इंद्रायणी व मुळा नद्याच्या पाण्याचे नमुने घेण्यात आले आहेत. लवकरच या नमुने तपासणीचा अहवाल प्राप्त होणार असून त्यातून नदी प्रदूषणाची पातळी आणि स्थिती समोर येणार आहे.





