Jammu & Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये ग्लेशियर कोसळण्याचा धोका; ६१६ पैकी ६८ हिमनदी सरोवरे संभाव्य धोकादायक
६१६ हिमनदी सरोवरांपैकी ६८ सरोवरांचे वर्गीकरण संभाव्य धोकादायक हिमनदी सरोवरे असे करण्यात आले आहे.

Jammu & Kashmir – जागतिक तापमानवाढ, हिमनद्यांचे वेगाने होणारे वितळणे आणि हिमनदी सरोवरांचा विस्तार यामुळे केंद्रशासित प्रदेशात ‘ग्लेशियर लेक आउटबर्स्ट फ्लड्सचा (ग्लोफ – हिमनदी सरोवरे फुटल्याने येणारा पूर) धोका वाढत असल्याचे जम्मू-काश्मीर सरकारने मान्य केले आहे.
विशेष म्हणजे, ६१६ हिमनदी सरोवरांपैकी ६८ सरोवरांचे वर्गीकरण संभाव्य धोकादायक हिमनदी सरोवरे असे करण्यात आले आहे. विधानसभेत नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार तनवीर सादिक यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्य सरकारने ही माहिती दिली.
काश्मीर विद्यापीठाने १२ जिल्ह्यांमध्ये एकूण २८.६२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ व्यापणाऱ्या ६१६ हिमनदी सरोवरांची ओळख पटवली आहे. किश्तवार, गांदरबल, कुलगाम आणि अनंतनाग यांसारख्या अनेक जिल्ह्यांमध्ये ग्लोफचा धोका सर्वाधिक आहे.
या जिल्ह्यांमध्ये हिमनदी सरोवरांची उपस्थिती आणि बदलती हवामान परिस्थिती पाहता अधिक देखरेख आणि तयारीची आवश्यकता आहे. त्यापैकी ६८ सरोवरांना नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीने निश्चित केलेल्या निकषांच्या आधारे संभाव्य धोकादायक म्हणून चिन्हांकित करण्यात आले आहे.
अलीकडच्या काळात जम्मू-काश्मीरमध्ये घडलेल्या अत्यंत हवामानविषयक घटनांच्या पार्श्वभूमीवर ही माहिती समोर आली आहे. गेल्या दोन वर्षांत ढगफुटी आणि अचानक आलेल्या पुरामुळे जीवितहानी झाली आहे, तसेच २४,००० हून अधिक घरे, ५,००० रस्ते आणि ४,००० पाणीपुरवठा योजनांचे नुकसान झाले आहे.
याव्यतिरिक्त, सुमारे एक लाख हेक्टर शेती आणि फळबागांच्या जमिनीवरही याचा परिणाम झाला आहे. उच्च-धोकादायक हिमनदी सरोवरांपासून निर्माण होणाऱ्या धोक्याचा सामना करण्यासाठी, सरकारने सप्टेंबर २०२४ मध्ये एका विशेष मुख्य समितीची स्थापना केली.
त्यानंतर समितीने १७ जोखीम निकषांच्या आधारे २४ अत्यंत महत्त्वाच्या सरोवरांचे ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ अशा श्रेणींमध्ये वर्गीकरण केले. नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरने जम्मू-काश्मीरमधील ०.२५ हेक्टरपेक्षा मोठ्या असलेल्या ५४६ हिमनदी सरोवरांचे मॅपिंग देखील केले आहे.





