राज्यात जीबीएसचा वाढतोय धोका; सांगलीत दोन रुग्णांचा मृत्यू

सांगली : राज्यात सध्या गुलेन बॅरे सिंड्रोम अर्थात जीबीएसच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने धोका वाढत आहे. त्यात मृतांचा आकडा कमी होताना दिसत नाही. सांगलीमध्ये या आजारामुळे दोन जणांचा मृत्यू झाला. यामध्ये १४ वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. जीबीएसची लागण झालेले हे दोन्ही रुग्ण मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचार घेत होते.
मिरजेत मृत्यू झालेल्यात हुक्केरी (जि. बेळगाव) येथील १४ वर्षीय मुलाचा आणि सांगोला (जि. सोलापूर) येथील ६० वर्षांच्या महिलेचा समावेश आहे. पुणे, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, नागपूरनंतर आता सांगलीमध्येही जीबीएसमुळे मृत्यूची नोंद झाल्याने राज्यातील एकूण मृतांची संख्या ११वर पोहोचली आहे.
सध्या राज्यात विविध रुग्णालयांत २० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. सांगलीच्या मिरजमधील शासकीय रुग्णालयात गेल्या १५ दिवसांत जिल्हा व जिल्ह्याबाहेरील १५ रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यापैकी ६ रुग्ण बरे झाले. त्यांना रुग्णालयातून घरी सोडले आहे.
दरम्यान, सध्या सात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एक रुग्ण पुण्याला, तर एक कराडला उपचारासाठी गेला आहे. १५ रुग्णांमध्ये सांगली शहरातील ३ रुग्णांचा समावेश आहे. शहरात चिंतामणीनगर, विश्रामबाग आणि संजयनगरमध्ये ‘जीबीएस’चे रुग्ण आढळले होते.





