Fraud Case: लग्न जुळविण्याच्या नावाखाली फसवणुकीची भीती; स्थळ चांगले असल्याचे आमिष, पैशांची मागणी!
Fraud Case: आॅनलाइन साइट्सबद्दलही सावध राहण्याची गरज

भोसरी – सध्या नवरात्राैत्सव सुरू असून येत्या एक ते दीड महिन्यात विवाह मुहूर्तांना सुरुवात होणार आहे. यामुळे विवाहयोग्य तरुण-तरुणींच्या कुटुंबामध्ये यंदा कर्तव्य पूर्ण करण्यासाठी लगबग सुरू आहे. आजच्या एकल कुटुंब पद्धतीत आणि नोकरी व्यवसायात गुंतलेल्या नागरिकांचा सामाजिक परिचय संकुचित झाला आहे.
यामुळे अपेक्षित स्थळ शोधण्यासाठी बड्या साइट्स आणि व्यावसायिक वधू-वर परिचय केंद्रांवर अवलंबून राहण्याची वेळ येत आहे. विशेषत: आॅनलाइन साइट्सवरुन ओळख काढून फसवणुकीचेही अनेक प्रकार घडले आहेत.
मुलगा उच्चशिक्षित, चांगल्या पगाराची नोकरी आणि मुलगी सुशिक्षित, सुसंस्कृत कुटुंबातील! अशा अपेक्षांमधून योग्य स्थळाचा शोध सुरू असतो. अनेक महिने प्रयत्न करूनही स्थळ जुळत नसल्याने पालकांची चिंता वाढते. याच चिंतेतून विवाह मध्यस्थांकडून मिळणाऱ्या आश्वासनांना कुटुंबे भुलण्याची शक्यता असते.
चांगले स्थळ मिळवून देण्यापासून ते लग्न निश्चित करून देण्यापर्यंतच्या आश्वासनांसाठी नोंदणी शुल्क, मध्यस्थीचे मानधन आणि आगाऊ रकमेची मागणी केली जाते. मात्र, पैसे दिल्यानंतर अपेक्षित स्थळ न मिळाल्यास किंवा संपर्कच होत नसल्यास पालकांना आर्थिक नुकसानीसोबत मनस्तापही सहन करावा लागतो.
आजच्या धावत्या युगात विवाह जुळविण्यासाठी मध्यस्थांची मदत घेण्याचे प्रमाण वाढले आहे. काही मध्यस्थ विश्वासार्हता जपून काम करतात, मात्र काही केवळ आश्वासने देऊन पैशांची मागणी करतात. मुलाचे शिक्षण, नोकरी, उत्पन्न आणि कौटुंबिक परिस्थिती याबाबत आकर्षक माहिती सांगून विश्वास संपादन केला जातो, प्रत्यक्ष पडताळणी केल्यानंतर माहितीमध्ये तफावत आढळल्यास विवाह इच्छुकांची निराशा होत आहे.
काही वेळा ठराविक कालावधीत स्थळ जुळवून देण्याचे आश्वासन दिले जाते, त्यासाठी मोठी रक्कम भरल्यानंतर अपेक्षित सेवा मिळाली नाही, तर पैसे परत मिळविण्यासाठीही संबंधितांना प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे मध्यस्थाची विश्वासार्हता, शुल्काच्या अटी आणि परताव्याची तरतूद आधीच स्पष्ट करून घेणे आवश्यक आहे.
स्वतंत्रपणे माहिती तपासावी
वय वाढत असल्याची चिंता, नातेवाइकांकडून होणारी विचारणा आणि योग्य जोडीदार मिळण्यास होणारा विलंब यामुळे पालक अनेकदा घाईने निर्णय घेतात. याच वेळी आकर्षक स्थळाचे आमिष दाखविणाऱ्यांपासून सावध राहणे गरजेचे आहे. विवाह इच्छुकांनीही केवळ मध्यस्थाने दिलेल्या माहितीवर अवलंबून न राहता संबंधित व्यक्तीची माहिती स्वतंत्रपणे तपासावी.
ऑनलाइन विवाहविषयक संकेतस्थळे आणि सोशल मीडियावरून स्थळे शोधतानाही बनावट प्रोफाइल किंवा पैशांच्या मागणीबाबत सतर्क राहावे, कोणतेही शुल्क भरताना पावती घ्यावी आणि व्यवहाराची नोंद जतन करावी, फसवणूक झाल्याचा संशय आल्यास पुराव्यांसह पोलिसांकडे तक्रार करावी, ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यास १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर त्वरित संपर्क ही साधता येतो किंवा cybercrime.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तक्रार ही नागरिकांना नोंदविता येते.





