पिंपरी | धोकादायक चेंबरमुळे अपघाताचा धोका

नेहरुनगर, (वार्ताहर) – खराळवाडी ते साई चौक भुयारी मार्गावर अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी चेंबरवरील झाकण तुटल्याने दुचाकी, चारचाकी वाहनांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
खराळवाडी ते साई चौका दरम्यान पादचारी व वाहनचालकांची मोठी वर्दळ असते. येथील चेंबरची दुरवस्था होऊनही महापालिकेच्या संबंधित विभागाच्या वतीने येथे अपघात होऊ नये यासाठी कोणतीही दखल घेण्यात आली नाही. येथे बॅरिकेड लावून संभाव्य अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
पुणे-मुंबई महामार्गावरून पिंपरी बाजारपेठ, काळेवाडी, पिंपरीगाव भागाकडे जाण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्याने येथून वाहनांची सतत वर्दळ असते. या रस्त्यावर ठराविक अंतरावर चेंबर असून त्यातील अनेक चेंबरची झाकणे कमकुवत आहेत. रात्री येथून प्रवास करताना तुटलेला चेंबर सहजा सहजी निदर्शनास येत नाही. त्यामुळे या चेंबरवरील झाकण त्वरित नव्याने बसविण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.





