Bhosari MIDC: भोसरी एमआयडीसीत वाढत्या चोर्या; अपुरी प्रकाशव्यवस्था आणि महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर
Bhosari MIDC: विद्यमान पथदिव्यांची रचना निष्प्रभ; हायमास्ट दिवे, उच्च क्षमतेची प्रकाशयोजना आणि सक्षम सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याची मागणी

पिंपरी – भोसरी एमआयडीसी परिसरात अलिकडच्या काळात कंपन्यांमधील चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. रात्रीच्या वेळी अनेक रस्त्यांवर अपुरी प्रकाशव्यवस्था असल्यामुळे औद्योगिक परिसराच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
हजारो कामगार आणि शेकडो महिला कर्मचारी दररोज ये-जा करत असलेल्या या औद्योगिक क्षेत्रात अंधाराचे प्रमाण वाढल्याने उद्योजक, कामगार आणि महिला कर्मचार्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे, या सदंर्भात तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी दिला आहे.
या सदंर्भात दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, एमआयडीसी परिसरात अनेक ठिकाणी पथदिवे बंद असून, काही ठिकाणी दिवे सुरू असले तरी त्यांची उंची, प्रकाशक्षमता किंवा दिशा योग्य नसल्याने प्रकाश थेट रस्त्यावर न पडता केवळ खांबाभोवती किंवा झाडांच्या फांद्यांमध्येच अडकतो, ज्यामुळे प्रकाश पूर्णपणे झाकला जात असून प्रत्यक्ष रस्ता अंधारात राहतो.
त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेली प्रकाशव्यवस्था अपेक्षित उद्देश साध्य करण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. विद्युत विभाग आणि उद्यान विभाग यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे पथदिव्यांची देखभाल, बंद दिव्यांची दुरुस्ती आणि झाडांच्या फांद्यांची नियमित छाटणी वेळेत होत नसल्याचे दिसून येते. परिणामी अंधाराची समस्या अधिक तीव्र होत आहे.
परिसरातील अंधारमय भागांबाबत अनधिकृत मद्यविक्रीच्या तक्रारी तसेच मद्यधुंद अवस्थेत फिरणार्या व्यक्तींमुळे, विशेषतः रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणार्या महिला कर्मचार्यांना भितीच्या वातावरणातून प्रवास करावा लागत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
एमआयडीसीतील सर्व बंद पथदिवे तातडीने सुरू करावेत, विद्यमान प्रकाशयोजनेचे तांत्रिक ऑडिट करून ज्या ठिकाणी प्रकाश रस्त्यावर पडत नाही तेथे उच्च क्षमतेचे एलईडी दिवे बसवावेत, झाडांच्या फांद्यांची नियमित छाटणी करावी आणि संपूर्ण औद्योगिक परिसरासाठी स्वतंत्र प्रकाशव्यवस्था सुधारणा आराखडा तयार करावा अशी मागणी इंडस्ट्रीज असोसिएशनने पालिकेकडे केलेली आहे.
भोसरी एमआयडीसीतील प्रमुख चौक, संवेदनशील व चोरीप्रवण भागात उच्च क्षमतेचे हायमास्ट दिवे बसवावेत. यामुळे सीसीटीव्हीची दृश्यता वाढून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. तसेच पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी दिला आहे.





