Rishikesh Vaidya : भोंदू ऋषिकेश वैद्यचा कोठडीत ‘देवभक्ती’चा बनाव! न्यायालयाने दाखवला दणका; वाचा सविस्तर
Rishikesh Vaidya : खरात प्रकरणानंतर राज्यातील भोंदूगिरीचा दुसरा मोठा प्रकार; कोठडीत देवभक्तीचा आव आणणाऱ्या आरोपीला झटका.

Rishikesh Vaidya – देवी शक्तीचा संचार असल्याची बतावणी करीत लैंगिक अत्याचार केलेल्या भोंदू ऋषिकेश वैद्यला पोलीस कोठडीत पूजेसाठी साहित्य मिळणार नाही. पूजेसाठी साहित्य मिळण्यासाठी त्याने केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला. नाशिक येथील कॅप्टन अशोक खरातचे प्रकरण राज्यभर गाजत असतानाच शहरातील हा प्रकार उघडकीस आला होता.
पीडितेची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर मी देवाचा भक्त असून, तुला उपासना अशी करायची, हे शिकवितो असे सांगून महिलेला जाळ्यात खेचले. तिच्यावर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी वैद्य याला अटक करून न्यायलायात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने ६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पोलीस कोठडीत पूजा करण्यासाठी साहित्य मिळण्याचा अर्ज त्याने न्यायालयात दाखल केला.
मात्र, न्यायालयाने हा अर्ज दाखल करून घेतला नाही. तर तपास अधिकाऱ्याला त्याला पूजेसाठी साहित्य उपलब्ध करून देण्याच्या तोंडी सूचना शनिवारी (दि.२८) दिल्या होत्या. मात्र, पोलिसांनी पूजेचे साहित्य दिलेच नाही. त्यामुळे बचाव पक्षाने पूजेसाठी साहित्य देण्याचा अर्ज ॲड. साजिद शहा यांच्यामार्फत केला. तपास अधिकारी आणि सरकारी पक्षाने सुरक्षिततेच्या कारणास्तव त्याला विरोध केला. त्यानुसार न्यायालयाने हा अर्ज फेटाळला.




