Rishi Sunak : “भारतासोबत व्यापारी संबंध आणखी घट्ट होणार’; ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे स्पष्टिकरण

लंडन – खलिस्तानी नेत्याच्या हत्येबाबत कॅनडाने भारतावर केलेल्या गंभीर आरोपांचा भारत (india) आणि ब्रिटन (britain) दरम्यानच्या व्यापारी वाटाघाटींवर परिणाम होणार नाही. या वाटाघाटी आतापर्यंत जशा सुरू होत्या, तशाच यापुढेही सुरू राहतील, असे ब्रिटनचे पंतप्रदान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी म्हटले आहे.
कॅनडाने केलेल्या आरोपांबद्दल ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्या प्रवक्त्याला विचारले असता हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मात्र ब्रिटन कॅनडाच्या संपर्कात आहे. मात्र त्याचा भारताबरोबरच्या चर्चेवर परिणाम होणार नाही, असे या प्रवक्त्याने म्हटले आहे.
खलिस्तानी फुटीरतावादी नेता आणि खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येशी भारताचा संभाव्य संबंध असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी सोमवारी संसदेत केला आहे.
त्याअनुषंगाने सुनक यांच्यावतीने हे स्पष्टिकरण देण्यात आले आहे. भारत आणि ब्रिटनने या महिन्याच्या सुरुवातीला ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराच्या दिशेने वेगाने काम सुरू ठेवण्याचे मान्य केले आहे.





