Rishabh Pant : ‘माफ करा, या वेळी आम्ही अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही’, लाजिरवाण्या पराभवानंतर पंतची भावुक पोस्ट

Rishabh Pant Apologise to fans : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ०-२ असा लाजिरवाणा पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय संघात निराशेचे वातावरण पसरले आहे. गुवाहाटी येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत संघाचे नेतृत्व करणाऱ्या यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत याने खराब कामगिरीबद्दल थेट चाहत्यांची माफी मागितली आहे. पंतने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत, या पराभवाची जबाबदारी स्वीकारली असून, कठोर मेहनत घेऊन जोरदार पुनरागमन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
लाजिरवाण्या पराभवानंतर पंतची भावुक पोस्ट –
ऋषभ पंतने सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, “या गोष्टीपासून दूर पळण्याची संधी नाही की, गेल्या दोन आठवड्यांत आम्ही चांगली कामगिरी केली नाही. एक संघ म्हणून आणि वैयक्तिक स्तरावर, आम्ही नेहमीच उच्च स्तरावर प्रदर्शन करू इच्छितो आणि कोट्यवधी भारतीयांच्या चेहऱ्यावर आनंद आणू इच्छितो. माफ करा, या वेळी आम्ही अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही.”
— Rishabh Pant (@RishabhPant17) November 27, 2025
ऋषभ पंत पुढे म्हणाला, “परंतु खेळ आपल्याला शिकवतो की, एक संघ म्हणून किंवा खेळाडू म्हणून शिका आणि पुढे जा. भारताचे प्रतिनिधित्व करणे हा आमच्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आहे. हा संघ काय करू शकतो, हे आम्हाला माहीत आहे आणि आम्ही कठोर मेहनत करू, पुन्हा एकत्र येऊ आणि अधिक मजबूत होऊन पुनरागमन करू. तुमच्या अतुट समर्थन आणि प्रेमासाठी धन्यवाद. जय हिंद.”
पंतचा खराब फॉर्म आणि टीका –
या संपूर्ण कसोटी मालिकेत भारतीय संघाचा कोणताही फलंदाज प्रभाव पाडू शकला नाही, मात्र कर्णधार ऋषभ पंतची कामगिरी सर्वाधिक निराशाजनक ठरली. या डावखुऱ्या फलंदाजाने दोन कसोटी सामन्यांत केवळ ४९ धावा केल्या. गुवाहाटी कसोटीत ज्या पद्धतीने त्याने आपली विकेट गमावली, त्यामुळे त्याच्यावर मोठी टीका झाली.
हेही वाचा – SMAT 2025 : मोठा उलटफेर! दुबळ्या जम्मू-काश्मीरने महाराष्ट्राला पहिल्याच सामन्यात लोळवले
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी तर, “त्याने प्रेक्षकांसाठी नव्हे, तर टीमसाठी खेळायला हवे,” असे कठोर उद्गार काढले होते. कर्णधार म्हणूनही पंत आपल्याच खेळाडूंवर जास्त संताप व्यक्त करताना दिसला. एकूणच, पंतसाठी ही मालिका खूप खराब ठरली आहे. आता हा खेळाडू कशी दमदार वापसी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





