पुरंदरमध्ये दंगा काबू पथक दाखल

दिवे – पुरंदर तालुक्यातील विमानतळ प्रकल्प बाधित गावामध्ये प्रशासनाने जबरदस्तीने ड्रोन सर्व्हे करण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकर्यांनी त्यास कडाडून विरोध केला. शेतकर्यांवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, मात्र आक्रमक झालेल्या शेतकर्यांनी सर्व्हे करणारा ड्रोन फोडून टाकला.
त्यामुळे हतबल झालेल्या प्रशासनाने सर्व्हे रद्द करणार असल्याचे सांगितले. मात्र, लेखी हमी दिल्याशिवाय रस्त्यावरून उठणार नाही, अशी भूमिका घेतली. शेतकर्यांचा विरोध झुगारून सर्व्हे करण्याच्या प्रयत्न करणार्या प्रशासनला भर उन्हात दिवसभर रस्त्यावरच अडवून ठेवले. संपूर्ण रस्तावर चक्काजाम करून वाहतूक बंद केली.
अखेर पोलिसांनी कोणताही ड्रोन सर्व्हे करणार नाही, असे प्रांताधिकारी वर्षा लांडगे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी सांगितले. त्यावर तुम्ही लेखी हमी दिल्यास आंदोलन थांबवितो असे सांगितले. मात्र अधिकारी लेखी हमी देत नसल्याने शेतकर्यांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला. सायंकाळी पाच वाजता पुन्हा जादा महिला पोलीस कर्मचार्यांची कुमक बोलाविण्यात आली. मात्र तरीही शेतकरी आक्रमक होत असल्याने सायंकाळी सहा वाजता दंगा काबू पथकाला पाचारण करण्यात आले.





