Rinku Singh Emotional Post : वर्ल्डकप जिंकला पण पाठीवर हात ठेवणारा बाप हरपला! रिंकूची वडिलांसाठी भावूक पोस्ट; म्हणाला, ‘कर्तव्य निभावलं पण…’
Rinku Singh Emotional Post : पितृशोक बाजूला सारून देशासाठी कर्तव्य बजावणाऱ्या रिंकूने आता विजयानंतर आपल्या भावनांना इन्स्टा पोस्टच्या माध्यामातून वाट मोकळी करून दिली आहे.

Rinku Singh emotional post for father after death : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय संघाने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष संपूर्ण देशभरात सुरू आहे. मात्र, रिंकू सिंगसाठी या विजयाचा क्षण जितका आनंदाचा आहे, तितकाच वेदनादायी देखील आहे. कारण विश्वचषक स्पर्धा सुरू असतानाच रिंकूच्या वडिलांचे निधन झाले होते. मात्र, पितृशोक बाजूला सारून देशासाठी कर्तव्य बजावणाऱ्या रिंकूने आता विजयानंतर आपल्या भावनांना इन्स्टा पोस्टच्या माध्यामातून वाट मोकळी करून दिली आहे.
वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मैदानात परतला –
स्पर्धेदरम्यान रिंकूचे वडील व्हेंटिलेटरवर असल्याचे समजताच तो तातडीने घरी गेला होता. मात्र, “कर्तव्य सर्वात आधी येते” ही वडिलांनीच दिलेली शिकवण लक्षात ठेवून, वडिलांच्या निधनानंतर रिंकू पुन्हा संघात सामील झाला. वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यांपूर्वी तो टीम इंडियात परतला. वडिलांची इच्छा होती की रिंकूने देशासाठी विश्वचषक जिंकावा, आणि वडिलांचे हेच स्वप्न उराशी बाळगून तो मैदानात शेवटपर्यंत लढला.
“तुमच्याशिवाय आयुष्य कसं असेल माहित नाही…”
View this post on Instagram
रिंकूने वडिलांसोबतचा एका नवीन कारसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, “मी कधीच इतका वेळ तुमच्याशी न बोलता राहिलेलो नाही. तुमच्याशिवाय पुढचे आयुष्य कसे असेल मला माहित नाही, पण प्रत्येक पावलावर मला तुमची गरज भासेल. बाबा, तुम्ही मला शिकवले की कर्तव्य श्रेष्ठ आहे, म्हणून मी तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मैदानात होतो. आज स्वप्न तर पूर्ण झाले, पण हा आनंद साजरा करण्यासाठी तुम्ही सोबत असायला हवे होतात. आता आनंदाच्या छोट्या-मोठ्या प्रत्येक क्षणी मला तुमची खूप आठवण येईल.”
स्पर्धेतील कामगिरी आणि चपळता –
या विश्वचषकात रिंकूला केवळ पाच सामन्यांत खेळण्याची संधी मिळाली. नेदरलँड्स आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने मोक्याच्या क्षणी चौकारांची आतषबाजी करत संघाला सावरले. जरी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसावे लागले, तरी राखीव खेळाडू म्हणून त्याने आपल्या क्षेत्ररक्षणाने आणि चपळाईने संघाचे मनोधैर्य उंचावले. वैयक्तिक आयुष्यातील एवढ्या मोठ्या घटनेनंतरही रिंकूने दाखवलेल्या खेळाडूवृत्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.





