पिंपरी | इर्शाळवाडी दरडग्रस्तांना हक्काची घरे लवकरच

खालापूर, (वार्ताहर) – इर्शाळवाडी दरडग्रस्तांना लवकरच त्यांची हक्काची घरे मिळणार आहेत. गतवर्षी दरड कोसळून घरे गमावलेल्या इर्शाळवाडी ग्रामस्थांना शासनाच्या माध्यमातून घरे बांधून दिली जात आहेत. काही दिवसांपूर्वी इर्शाळवाडी दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण झाले. मात्र इर्शाळवाडी दरडग्रस्तांना अद्याप त्यांची हक्काची घरे मिळाली नसल्याने याबद्दल चर्चा होऊन सरकारवर टीका होत होती. आता मात्र इर्शाळवाडी ग्रामस्थांना त्यांची हक्काची घरे लवकरच मिळणार असल्याचे समजत आहे.
दरड कोसळून दुर्घटना घडलेल्या इर्शाळवाडी गावाजवळ ५ किमीच्या अंतरावर असणाऱ्या शासकीय जागेत दरडग्रस्तांना हक्काची आणि कायमची पक्की घरे सरकारच्या वतीने बांधून दिली जात आहेत. सिडकोच्या माध्यमातून ही घरे बांधली जात आहेत. जवळपास सर्व घरे पूर्ण झाली असून लवकरच बाधितांना त्यांच्या घरांचे वाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित होणार आहे. या कार्यक्रमाची फक्त तारिख समोर यायची उत्सुकता आहे.
वर्षभरात नवीन घरे –
दरडग्रस्तांना वर्षभरात नवीन घरे मिळत आहेत. सिडकोने एकूण ४४ घरांचे बांधकाम जवळपास पूर्ण केले आहे. ही घरे मिळेपर्यंत दरडग्रस्तांचे तात्पुरते पुनर्वसन चौक येथील कंटेनर वसाहतींमध्ये केले आहे. इर्शाळगडाच्या पायथ्याशीच आता नव्याने इर्शाळवाडी उभी राहत आहे. याठिकाणी घरांसोबत समाज मंदिर, अंगणवाडी, खेळाचे मैदान, अंतर्गत रस्ते आणि पाण्याचे योग्य नियोजन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इर्शाळवाडी दुर्घटनेकडे जातीने लक्ष दिले. सरकारने दरडग्रस्त कुटुंबाची तात्पुरती व्यवस्था कंटेनर वसाहतीत केली. वर्षभर प्रशासनाने येथील कुटुंबांची योग्य ती काळजी घेतली आहे. २४ तास पाणी, वीज आरोग्यसेवा, मोफत रेशन, मोफत गॅस सिलेंडर आदी सुविधा पुरविल्या आहेत. याशिवाय खासदार श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशनने १८ मुलांना दत्तक घेतले आहे.
इर्शाळवाडी दुर्घटना –
रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथील कुटुंबांसाठी १९ जुलै २०२३ हा दिवस अत्यंत दु:खद ठरला. इर्शाळवाडी साखरझोपेत असताना थरकाप उडवणारी घटना घडली. रात्री अकराच्या सुमारास वाडीजवळ असणारी दरड अचानक कोसळली. या दुर्घटनेत ८४ जणांचा मृत्यू झाला. ४३ कुटुंबांतील २२८ रहिवाशांपैकी २३ मुलांसह केवळ १४४ जण घटनेत वाचले. आजही दुर्घटनेतील मृत ५७ जणांचे मृतदेह टेकडीच्या भूभागात पुरलेले आहेत.





